Mahesh Manjrekar Praises National Award Winners Treesha & Bhargav : महेश मांजरेकर सध्या त्यांच्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. याचं लेखन व दिग्दर्शन त्यांनी स्वत: केलं आहे. नुकताच २ ऑक्टोबर रोजी या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला. अशातच आता त्यांनी याबद्दल व यामधील कलाकारांबद्दल सांगितलं आहे.
महेश मांजरेकर यांनी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटातील दोन बालकलाकार त्रिशा ठोसर व भार्गव जगतापबद्दल सांगत त्यांचं कौतुक केलं आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’मध्ये अभिनेता सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून झळकणार आहे. त्याच्याबरोबर यामध्ये मराठी इंडस्ट्रीतील इतरही अनेक लोकप्रिय कलाकार पाहायला मिळणार आहेत. परंतु, यामध्ये सध्या चर्चेत असलेले दोन बालकलाकार त्रिशा व भार्गवही झळकणार आहेत.
त्रिशा व भार्गव यांना अलीकडेच ‘नाळ २’ चित्रपटातील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्रिशा ही चार वर्षांची असून, इतक्या लहान वयात इतकं मोठं यश मिळवल्यामुळे सध्या अनेकांकडून तिचं कौतुक होत आहे. तर भार्गवचंही अनेक जण कौतुक करीत असून, आता महेश मांजरेकर यांनीसुद्धा या दोन बालकलाकारांचं कौतुक केलं आहे.
महेश मांजरेकर यांनी केलं त्रिशा ठोसर व भार्गव जगतापचं कौतुक
महेश मांजरेकर ‘महाराष्ट्र टाइम्स’शी संवाद साधताना त्रिशा व भार्गवचं कौतुक करीत म्हणाले, “मी ‘नाळ २’ हा सिनेमा पाहिला. त्यातलं त्रिशा व भार्गव यांचं काम पाहून मी प्रभावित झालो. तेव्हाच या दोन्ही बालकलाकारांसाठी सिनेमा करायचा, असं ठरवलं. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मला हे दोन बालकलाकार गवसले आणि सिनेमा आकार घेऊ लागला.”
महेश यांनी यावेळी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाबद्दलही सांगितलं आहे. ते म्हणाले, “महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अवस्था पाहून मला त्रास होत होता. शेतकऱ्यानं पिकवलं नाही, तर ते आपल्या ताटात कधी येणारच नाही. शेतकऱ्याच्या शेतातल्या पिकाच्या देठाला हात लावाल, तर त्यांचे हात कलम केले जातील, असं सांगणारे शिवराय आज विस्मरणात गेले आहेत.”
महेश मांजरेकर पुढे म्हणाले, “माझ्यासाठी हा चित्रपट म्हणजे आजच्या समाजाशी भिडण्याचा प्रयत्न आहे. आजच्या पिढीपुढे असलेल्या प्रश्नांकडे पाहताना, त्यांच्या विचारांचा प्रकाश पडद्यावर आणायचा आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट इतिहास सांगणारा आहे; पण त्याचबरोबर तो वर्तमानाला प्रश्न विचारणारा, त्याला जागवणारा आणि दिशा दाखवणारा ठरेल.”
दरम्यान, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांत दाखल होणार आहे. त्यामध्ये सिद्धार्थ बोडके, त्रिशा ठोसर व भार्गव जगताप यांच्याव्यतिरिक्त सयाजी शिंदे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, शशांक शेंडे, पायल जाधव यांसारखे इतरही अनेक कलाकार झळकणार आहेत.