‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर पुन्हा चर्चेत आले आहेत. अभिनेता सिध्दार्थ बोडके आणि बालकलाकार त्रिशा ठोसर, भार्गव जगताप अशा नवीन कलाकारांना घेऊन केलेला ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा महेश मांजरेकर यांचा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. त्या निमित्ताने ‘लोकसत्ता’च्या कार्याला दिलेल्या भेटीदरम्यान मराठी चित्रपटांना शो मिळत नाहीत, याहीपेक्षा मराठी चित्रपटांना तिकीटविक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात इतर भाषिक चित्रपटांपेक्षा कमी वाटा मिळतो हा गंभीर मुद्दा आहे, याकडे मांजरेकर यांनी लक्ष वेधले.
मराठीला ४५ टक्के का?
मराठी चित्रपटांना शो मिळत नाहीत, या म्हणण्यात फार तथ्य नसल्याचं मांजरेकर स्पष्ट करतात. ‘मुंबई ही सिनेमाची बाजारपेठ आहे. इथे तमिळ, तेलुगू, कन्नड सगळे चित्रपट त्या त्या भाषेसह हिंदीतही प्रदर्शित होतात. इथला चित्रपटगृह व्यावसायिक कोणत्या चित्रपटाला प्रेक्षक अधिक येत आहेत हे बघून शो देतो. त्याच्यासाठी आर्थिक समीकरण महत्वाचं आहे. ‘दशावतार’ चांगला चालला आहे म्हटल्यावर त्याचे शो वाढवले पाहिजेत हे त्यांना सांगण्याची गरज भासत नाही. त्यामुळे चित्रपट मराठी असो वा हिंदी तो चालला तर त्यांना शो मिळणारच’ असं त्यांनी सांगितलं.
‘विचार करण्यासारखा मुद्दा वेगळाच आहे. आपल्याकडे पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाचं बुकिंग करताना उत्पन्नात ५०-५० टक्के भागीदारीचा करार केला जातो. म्हणजे तिकीटविक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी ५० टक्के चित्रपटगृह व्यावसायिकांना जातात, तर ५० टक्के निर्मात्यांना मिळतात. मात्र, मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांना ४५ टक्केच दिले जातात.
हा अन्याय का? फक्त मुंबईत नव्हे तर ठाणे, पुणे सगळीकडे मराठी चित्रपटांनाच ५५-४५ टक्के समीकरण कशासाठी? तमिळनाडूमध्ये आता हिंदी गाणी, चित्रपटांवर बंदी आणण्यासाठी विधेयक आणलं जातं आहे. आपल्याकडे अशाप्रकारे बंदी येणार नाही, पण किमान महाराष्ट्रात मराठी चित्रपटांनाही इतर भाषिक चित्रपटांप्रमाणेच आर्थिक फायदा मिळाला पाहिजे, यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न केले गेले पाहिजेत’, असं परखड मत महेश मांजरेकर यांनी व्यक्त केलं.
‘मना’चे श्लोकसाठी ठाम राहायला हवं होतं…
‘मना’चे श्लोक सिनेमाला पाठिंबा देण्यासाठी बरेच नट पुढे आले. पण, त्यांनी नाव बदलण्याची घाई करायला नको होती, असं मत मांजरेकर यांनी व्यक्त केलं. ‘मी ‘शिक्षणाच्या आयचा घो’ सिनेमाच्या वेळी शेवटपर्यंत थांबलो. मी अजिबात नाव बदलणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली होती. ‘शिक्षणाच्या आयचा घो’ मध्ये शिवी वगैरे काही नव्हतं. आयचा घो म्हणजे कोकणात ‘आईचा नवरा’. कोणाला तरी वाटलं ती शिवी आहे. पण, कुणाच्या भावना दुखावल्या जातील अशी गोष्ट मी करत नाही. तसंच ‘मनाचे श्लोक’ ही एक मनवा आणि श्लोक यांची गोष्ट होती. त्यामुळे त्यांनी त्यावर ठाम राहायला पाहिजे होतं. आपण बदललो की समोरच्या लोकांना प्रोत्साहन मिळत’, असं परखड मत त्यांनी व्यक्त केलं. ‘सेन्सॉरने जे संमत केलंय त्यावर कोणीही आक्षेप घेऊ नये या ठाम मताचा मी आहे. हिंदीत सुद्धा अलीकडे बरेच सिनेमे निघतात, त्यात प्रचारकी चित्रपटांचाही समावेश असतो, पण हे प्रेक्षकांच्या हातात आहे की, अशा सिनेमांना जायचं की नाही’, असंही त्यांनी सांगितलं.
ऐतिहासिक व्यक्तिरेखा, समकालीन विषय
‘झी स्टुडिओ’बरोबर दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा हा पाचवा एकत्र चित्रपट आहे. याआधी ‘दे धक्का’, ‘काकस्पर्श’, ‘नटसम्राट’, ‘पांघरूण’ असे चित्रपट मांजरेकरांबरोबर केले. मात्र, ऐतिहासिक व्यक्तिरेखा आणि समकालीन विषय असा सुरेख मिलाफ ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच जुळून आला आहे. प्रेक्षकांना दिवाळीच्या आनंददायी वातावरणात एक चांगल्या विषयावरचा भव्य चित्रपट पाहायला मिळेल’, असं झी स्टुडिओचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनी सांगितलं.
चांगली संधी चालून आली…
‘आशय पुढे घेऊन जाणारा अभिनेता असायला हवा. जेव्हा एखादा कलाकार चित्रपट पूर्णपणे आपल्या खांद्यावर पेलून घेतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने अभिनेता म्हणून ओळखला जातो. सिध्दार्थ बोडके हा या तरुण फळीतला अशापध्दतीचा अभिनेता आहे’, अशा शब्दांत अभिनेते मंगेश देसाई यांनी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या सिध्दार्थ बोडकेचं कौतुक केलं. तर शारीरिक स्थित्यंतर, अॅक्शन आणि खूप गंभीर, महत्वाचा विषय अशा सगळ्याच बाजूंनी आव्हानात्मक आणि मला नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी करायला लावेल, अशी भूमिका असलेला हा चित्रपट होता. हा चित्रपट म्हणजे खूप सुंदर संधी चालून आली होती आणि कुठलाही विचार न करता मी ती घेतली, असं सिध्दार्थने सांगितलं.
समाजमाध्यमांवर बोलताना लोकांनी भान ठेवायला हवं…
‘समाजमाध्यमांमुळे रोज लाख दिग्दर्शक, लाख लेखक बनतात. एका ट्रेलरवरून चित्रपटाविषयी जल्पकांकडून तरतऱ्हेची मतं व्यक्त केली जातात. त्यांना त्या विषयातलं काही साधारण ज्ञान किंवा कल्पना असते असंही नाही. तरीही आपल्यालाच सगळं माहिती असल्याचा आव आणून ही मंडळी वाटेल ती विधानं करत असतात. खूप लोकांना काहीतरी बोलायचं त्यांचा आवाज कोणीतरी ऐकतो किंवा वाचतो, यातच त्यांना आनंद वाटतो’ असं मांजरेकर यांनी सांगितलं. तर लोकांना बोलण्याचा हक्क असला तरी कोणाविषयी तुम्ही बोलत आहात, याचं तरी भान ठेवायला हवं, असं मत मंगेश देसाई यांनी व्यक्त केलं.
मी गारठलो होतो…
‘नाळ २’साठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार स्वीकारल्यानंतर बालकलाकार भार्गव जगतापचे कौतुक खुद्द अभिनेता शाहरुख खानने केले. त्या प्रसंगाची आठवण सांगताना शाहरुख खान यांनी हात हातात घेऊन जेव्हा अभिनंदन केलं तेव्हा मी पूर्ण गारठलो होतो, असं भार्गवने सांगितलं. ‘हे खरं आहे की स्वप्न. मी पळून जाऊ की काय करू… मला काहीच समजत नव्हतं. पूर्ण गारठून गेलो होतो’, असं त्याने सांगितलं. तर या चित्रपटाच्या निमित्ताने महेश मांजरेकर यांच्याबरोबर काम करायची इच्छा पूर्ण झाल्याचं बालकलाकार त्रिशा ठोसरने सांगितलं.
हा सिक्वेलपट अजिबात नाही…
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाचा सिक्वेलपट अजिबात नाही, असंही मांजरेकर यांनी स्पष्ट केलं. ‘मी ‘नाळ २’ चित्रपट पाहिला आणि मला त्यातले दोन बालकलाकार त्रिशा ठोसर, भार्गव जगताप यांचं काम आवडलं. मला त्यांच्याबोरबर एक तरी चित्रपट करायचा होता. माझ्या डोक्यात शेतकरी आत्महत्या हा विषय खूप वर्ष घोळत होता. ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर आपण जगतो, तोच तुलनेने छोट्या-छोट्या रक्कमेच्या कर्जापोटी जीव देतो, ही अतिशय चीड आणणारी गोष्ट आहे. आज जर शिवाजी महाराज असते तर त्यांच्या मनात शेतकऱ्यांची ही दैना पाहून किती अंगार पेटला असता अशी कल्पना माझ्या डोक्यात आली आणि त्यातून ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट आकाराला आला’ असं त्यांनी सांगितलं. या चित्रपटाच्या पटकथा लेखनासाठी ‘तेरवं’ चित्रपटाचे श्याम पेटकर यांनी दिलेल्या माहितीची मदत झाली, तर संजय पवार यांनीही खूप उत्तम संवाद लेखन केल्याचंही मांजरेकर यांनी सांगितलं.
