Marathi actor Deepak Shirke : ‘थरथराट’, ‘दे दणादण’, ‘अग्निपथ’, ‘धडाकेबाज’, ‘हम’, ‘वंश’, ‘तिरंगा’, ‘व्हेंटिलेटर’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारे अभिनेते म्हणजे, दीपक शिर्के. मराठीसह हिंदी सिनेविश्वातही त्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. संघर्ष, मेहनत आणि सातत्य यामुळेच त्यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास लक्षवेधी ठरला आहे.
रंगभूमीपासून मराठी सिनेमा आणि त्यानंतर बॉलीवूडमध्ये नाव कमावलेल्या दीपक शिर्के यांनी नुकत्याच एका मुलाखतीत ‘मला लोकाश्रय खूप मिळाला, पण राजाश्रय मिळाला नाही’ असं म्हटलं आहे. सौमित्र पोटे यांच्या मित्र म्हणे या पॉडकास्टमध्ये दीपक शिर्केंनी हे वक्तव्य करीत खंत व्यक्त केली.
या मुलाखतीत दीपक शिर्केंना “राजाश्रय मिळायला हवा होता का?” असा प्रश्न विचारला. त्यावर दीपक शिर्के उत्तर देत म्हणाले, “आता आता असं वाटायला लागलं की, राजाश्रय मिळायला हवा होता, पण तेव्हा असं कधी वाटलं नव्हतं. तेव्हा असं वाटायचं की, लोकाश्रयच बरा आहे. राजा काय आपल्याला कधीही उभा राहा… नाच… असं सांगेल. त्यापेक्षा लोकाश्रयच बरा.”
पुढे ‘आता राजाश्रय का महत्त्वाचा वाटतो?’ असा प्रश्न विचारण्यात आला. याविषयी दीपक यांनी उत्तर दिले की, “आता माझ्या मागून आलेले पद्मश्री वगैरे पुरस्कार घेऊन गेले. आम्ही इतकं करुनसुद्धा काही नाही, असं वाटतं. मी आणि माझी बायको असे आम्ही दोघंच आहोत, एक भाऊ आहे; तो पण ६०-६५ वर्षांचा आहे. मग आता पुढे कोण असणार? हा प्रश्न उरतोच ना…”
पुढे इतक्या सगळ्या कामानंतर, वाटचालीनंतर, इतका लोकाश्रय मिळाल्यानंतर एखाद्या अभिनेत्याला अशी चिंता सतावणं, हे या व्यवस्थेचं अपयश आहे का? असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावर दीपक यांनी असे म्हटले की, “नाही, हे व्यवस्थेचं नाही, हे माझं दुर्दैव आहे. मी त्यांना दोष नाही देऊ शकत. नक्कीच नाही. काय करायला हवं, याचं उत्तर मला सापडत नाही. पण आता मला पद्मश्री पुरस्कार मिळाला, तर माझ्या अंत्यविधीला ५० पोलीस तरी येतील ना…”