सातच्या आत घरात! ही आजच्या काळातली अशक्य वाटणारी संकल्पना. कारण ऑफिस, क्लासेस आणि एकूणच बदलेल्या जीवनशैलीमुळे आता ही संकल्पना अस्तित्वातच नाही असं चित्र आहे. अर्थात काळानुरूप काही गोष्टी बदलतात. त्यातलीच ही एक. मात्र पुर्वी सातच्या आत ही संकल्पना होती आणि संकल्पना केवळ वेळेशी निगडित नव्हती. तर यामागे काही विचार होते.

सातच्या आत घरात… याबद्दल आता अनेकांना जाच वाचू शकतो किंवा आपल्यावर काहीतरी नियम लावले आहेत की, काय असं वाटू शकतं. पण काही वर्षांपुर्वी सातच्या आत घरात या संकल्पनेचं अनेकांकडून पालन केलं जात असत. याबद्दल एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही अभिनेत्री म्हणजे किशोरी गोडबोले. किशोरी गोडबोलेंनी नुकताच लोकमत फिल्मीशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी असं म्हटलं, “सातच्या आत घरात हा माझ्यासाठी नियम होता, जेव्हा मी लहान होते. पण माझा स्वभाव असा आहे की, मी कधीही आई-वडिलांना याबद्दल दोष दिला नाही. सातच्या आत घरात का? मग नंतर आम्ही मज्जा करायची नाही का? पण मी काय करायचे, सातपर्यंत मैत्रिणींबरोबर खूप मज्जा करायचे. कॉलेज असायचं. कधीतरी चित्रपट बघायला गेलो किंवा कुठे काही खायला गेलो, फिरायला गेलो.”

यापुढे तिने सांगितलं, “सगळी मज्जा करून मी बरोबर सातच्या आत घरात शुभंकरोती म्हणायला यायचे. आईबाबांनी सांगितलं ना की, सातच्या आत घरात संध्याकाळी यायचं तर यायचं. कारण हा आई-वडिलांबद्दलचा आदर आहे. म्हणजे मी नियमात राहूनही मज्जा केली. मला कधी त्या नियमाचा जाच नाही वाटला. ते आई-वडिलांबद्दलचं प्रेम होतं आणि त्यांच्याबद्दलचा तो आदर होता.”

दरम्यान, किशोरी गोडबोले यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी ‘फुल थ्री धमाल’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘वन रूम किचन’, ‘हवाहवाई’, ‘बाबा लगीन’यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तर त्यांच्या ‘मेरे साई’, ‘हद कर दी आपने’, ‘खिडकी’ यांसारख्या मालिकाही गाजल्या. त्यांनी झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘अधूरी एक कहानी’मध्ये अमृता हे मुख्य पात्र साकारले होते.

किशोरी सध्या मनोरंजन क्षेत्रात सहभागी नाहीत. पण त्यांची मुलगी अभिनयाबरोबर इतर काही क्षेत्रांमध्ये आपले नाव कमावत आहे. किशोरींची मुलगी सईने एक नवी भरारी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी किशोरी गोडबोलेच्या लेकीची ॲपलच्या ब्रँड ॲम्बेसेडरपदी निवड झाली. यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता.