Marathi Actress Talk About Riteish Deshmukh : अजय देवगण आणि रितेश देशमुखची मुख्य भूमिका असलेला ‘रेड २’ हा चित्रपट १ मे २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. यावर्षीच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘रेड २’ने स्थान मिळवलंय.
या सिनेमात अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्यासह वाणी कपूरही मुख्य भूमिकेत आहे. त्याचबरोबर या सिनेमात मराठी अभिनेत्री रितिका क्षोत्रीसुद्धा पाहायला मिळाली. रितिकाने स्वत: याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. अशातच तिने आता या सिनेमात रितिकाने रितेश देशमुख आणि अजय देवगणबरोबरच्या कामाचा अनुभव शेअर केला.
याबद्दल मुक्कामपोस्ट मनोरंजनला दिलेल्या मुलाखतीत रितिका म्हणाली, “खूपच भारी अनुभव होता. मी या चित्रपटासाठी पहिल्यांदा एक ऑडिशन दिली होती आणि त्यानंतर मला निवड झाल्याचा फोन आला होता. त्यामध्ये माझं लखनौला अवघ्या पाच-सहा दिवसांचं शूट असणार होतं. यात पाच-सहा सीन्स होते. यासाठी मी खूपच उत्सुक होते आणि मी याची खूप चांगली तयारीही केली होती. त्यानंतर सेटवर गेल्यावर मला जाणवलं की, आता मी हे सगळं बाजूला ठेवून समोर जे येतंय ते केलं पाहिजे. “
यापुढे रितिकाने रितेश देशमुखबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. याबद्दल ती म्हणाली, “माझा पहिला सीन रितेश सरांबरोबर होता आणि अनुभव खूपच छान होता. एकतर मी त्यांची मोठी चाहती आहेच. ते सगळ्यांबरोबर अहो-जाओ करुन अगदी आदराने बोलतात. त्यामुळे मला अगदी गोंधळल्यासारखंच झालं होतं. त्यानंतर आमचे बरेच सीन झाले. पहिल्यांदा आमचा त्या सीनचा वाईड सीन झाला आणि मग त्यांचा क्लोज सीन झाला. तेव्हा माझ्या क्लोज सीनसाठी ते सेटवर थांबले होते. बऱ्याचदा कलाकार दुसऱ्याचा क्लोज असेल तर सेटवर थांबत नाही, पण रितेश सर थांबले होते. ते स्वत:च म्हणाले की, मी थांबतो. त्यामुळे तो माझ्यासाठी तो क्षण खूपच स्पेशल होता.”
यापुढे रितिका अजय देवगणबद्दल म्हणाली… “दोन-तीन दिवसांनी अजय सरांबरोबर मी काम करणार होते. तो सीन माझा अगदी चार मिनिटांतच शूट झाला. तो सीन आम्ही एकदाच केला; पण चांगला झाला. सगळ्यात भारी म्हणजे त्यां सिनेमाचं क्लायमॅक्स शूट करताना जवळपास हजार ते पंधराशे लोक तिथे होते. तीन दिवस त्या क्लायमॅक्सच्या सीनचं शूट चालू होतं. ते सगळं पाहून मी खूपच भारावून गेले.”