Marathi Actress Ganpati Idol Making Video : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेत. श्रीगणरायाच्या आगमनासाठी भक्त मंडळी सज्ज झाली आहेत. घरोघरी गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. दरवर्षी सेलिब्रिटीही मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करताना दिसतात.

मराठीसह बॉलीवूड कलाकारांच्या घरीही बाप्पा विराजमान होतो. अनेक कलाकार घरातील गणरायाची मूर्ती स्वतःच्या हातानं घरच्या घरीच साकारतात. अशातच अभिनेत्री सायली पाटीलनंही घरीच लाडक्या बाप्पाची मूर्ती घडवली आहे. बाप्पाची मूर्ती साकारतानाचा व्हिडीओ तिनं शेअर केला आहे

सोशल मीडियावर सायली तिचे अनेक स्टायलिश लूकमधील फोटोही शेअर करीत असते. अशातच तिने शेअर केलेला नवा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. सायलीनं स्वत:च्या हातांनी बाप्पाची मूर्ती साकारतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासह तिनं तिच्या आनंदी भावनाही व्यक्त केल्या आहेत.

सायली पाटील या व्हिडीओखाली कॅप्शनमध्ये असं म्हणते, “मी मूर्तिकार नाही, म्हणून मूर्ती बनवताना खूप दडपण येतं; खास करून डोळे बनवताना. पण, काय माहीत आहे का… दर वेळी बाप्पाची मूर्ती घडवताना काहीतरी वेगळाच अनुभव येतो. माझ्या हातून मूर्ती घडत असते; ण आकार तो स्वतः घेत असतो. जणू बाप्पाच स्वतःला आपल्या हातांनी आकार देतोय, अशी जाणीव होते. हा अनुभव शब्दांत मांडता येणार नाही… बाप्पा, तू असाच सगळ्यांच्या जीवनात आनंद, प्रेम आणि समाधान भरत राहा. गणपती बाप्पा मोरया.”

सायली पाटील इन्स्टाग्राम व्हिडीओ

दरम्यान, या व्हिडीओत सायली मातीपासून गणपतीची मूर्ती साकारताना दिसत आहे. सायलीनं बालगणेशाची मूर्ती बनवली आहे. लाडक्या बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हातानं तयार करतानाचा व्हिडीओ पाहून तिचे अनेक चाहते सायलीचं कौतुक करीत आहेत. तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी तशा प्रतिक्रियासुद्धा व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओला तिनं ‘आमचा बालगणेश’, अशी कॅप्शन दिली आहे.

सायलीने नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटातील तिची भावनाभाभी ही भूमिका लोकप्रिय ठरली होती. त्यानंतर सायली ‘घर बंदूक बिरयानी’ या सिनेमात आकाश ठोसरबरोबर पाहायला मिळाली. गेल्या वर्षी तिचा ‘येक नंबर’ सिनेमा आला होता. अभिनेत्री असण्याबरोबरच सायली इंटेरियर डिझायनरदेखील आहे.