Mrunmayee Deshpandes big announcement about Tu Bol Na: अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची प्रमुख भूमिका असलेला तू बोल ना हा सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे. याआधी १० ऑक्टोबरला हा सिनेमा मनाचे श्लोक या नावाने प्रदर्शित झाला होता; पण नावामुळे हा चित्रपट वादात अडकला होता.

पश्चिम महाराष्ट्रासह इतर ठिकाणी या सिनेमाला विरोध दर्शविला जात होता. काही ठिकाणी चित्रपटाची पोस्टर्स फाडण्यात आली. त्यानंतर या सिनेमाचे प्रदर्शन थांबवण्यात आले. आता या सिनेमाचे नाव बदलण्यात आले असून, ‘मनाचे श्लोक’ऐवजी ‘तू बोल ना’, असे नाव ठेवण्यात आले आहे. आजपासून म्हणजेच १६ ऑक्टोबरपासून हा सिनेमा पुन्हा प्रदर्शित केला गेला आहे.

आता याच निमित्ताने अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्याबरोबर सिनेमात प्रमुख भूमिकेत असलेला राहुल पेठेदेखील दिसत आहे.

काय आहे मृण्मयी देशपांडेची खास ऑफर?

अभिनेत्री म्हणते, “व्हिडीओ यासाठी आहे की, तू बोल ना हा आमचा सिनेमा म्हणजे मनवा आणि श्लोकचा सिनेमा सगळीकडे प्रदर्शित झालेला आहे. आज संध्याकाळी सवासहा वाजता सिटी प्राइड कोथरूडला या सिनेमाचा प्रीमियर आहे. तर आम्ही आमच्याकडून १०० पासेस फ्री ठेवलेले आहेत. जे १०० लोक पहिल्यांदा येतील, त्यांना हे फ्री पासेस मिळतील. आम्ही ते पासेस थिएटरला ६ वाजल्यापासून ठेवू.”

व्हिडीओमध्ये पुढे अभिनेता राहुल पेठे म्हणतो, “हा चित्रपट एकत्र बघूयात. तुम्हाला हा चित्रपट नक्की आवडेल.” पुढे गमतीने मृण्मयी असेही म्हणते की, माझं काम आवडेल; याचं माहीत नाही. पुन्हा ती म्हणते की, याचंही काम आवडेल. कारण- चित्रपट मी दिग्दर्शित केला आहे. पण, नक्की या. भेटूयात.

हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले, “आमचा ‘तू बोल ना’ या चित्रपटाचा प्रवास सुरू होत आहे आणि तो तुमच्याबरोबर साजरा करायला आवडेल. तुमच्या प्रेमासाठी मानावेत तेवढे आभार कमी आहेत. बाकी गोष्टी व्हिडीओमध्ये बोलले आहे.”

मृण्मयी देशपांडेने या चित्रपटात अभिनयच केला नाही, तर चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. तसेच, चित्रपटाची कथादेखील तिने लिहिली आहे. ‘मनाचे श्लोक’ला विरोध झाल्यानंतर आणि चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक कलाकारांनी या चित्रपटाच्या टीमला पाठिंबा देणाऱ्या पोस्ट शेअर केल्या होत्या. तसेच, कलाकारांना धीरदेखील दिला होता.

या चित्रपटात मृण्मयी देशपांडे व राहुल पेठेसह लोकप्रिय अभिनेत्री शुभांगी गोखले, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब, लीना भागवत, मंगेश कदम व उदय टिकेकर हे कलाकार प्रमुख भूमिकांत आहेत. आता पुन्हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.