मराठी कलाविश्वातील बऱ्याच अभिनेत्री सोशल मीडियावर आपली स्पष्ट मांडत असल्याचं आपण अनेकदा पाहिलंय. मराठीसह हिंदी कलाविश्वात लोकप्रिय असणाऱ्या क्षिती जोगने नुकत्याच ‘आरपार’ युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत मंगळसूत्र न घालण्याबाबत भाष्य करत तिचं स्पष्ट मत मांडलं होतं. या मुलाखतीचा टीझर लेखिका व अभिनेत्री मुग्धा गोडबोलेने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

क्षिती जोगने मंगळसूत्र घालावं की नाही हा वैयक्तिक प्रश्न असल्याचं म्हणत या मुलाखतीत आपलं मत मांडलं होतं. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ गुरुवारपासून प्रचंड व्हायरल होत असून यावरून नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. काही लोकांनी अतिशय असभ्य भाषेत कमेंट्स केल्या असल्याचं मुग्धा गोडबोलेला लक्षात आलं आणि लेखिका चांगलीच संतापली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुग्धाने घडल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्ती करून नेटकऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.

हेही वाचा : Video : मराठी कलाकारांना पडली ‘गुलाबी साडी’ गाण्याची भुरळ, Filmfare मध्ये केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

मुग्धा गोडबोलेची फेसबुक पोस्ट

हे रील नेहमीप्रमाणे मी instagram वर पोस्ट केलं. शनिवारी एपिसोड येणार, गुरुवारपासून त्याचं प्रमोशन सुरू होतं. हा व्यवसायाचा भाग आहे. मुद्दा हा आहे की instagram वर ह्या रील खाली साधारण ३०० च्या वर कॉमेंट्स आहेत आणि त्यातल्या बहुतेक पुरुषांच्या आहेत. त्या अत्यंत गलिच्छ भाषेत, घाणेरड्या पद्धतीने लिहिलेल्या आणि अश्लील अश्लाघ्य आणि बीभत्स आहेत. आश्चर्य वाटावं का नको असाही आता प्रश्न पडतो. क्षितीच्या पिढीतल्या अनेक बायका रोज घराबाहेर पडताना मंगळसूत्र घालत नाहीत. त्याला अनेक कारणं आहेत. आवडत नाही, चोरांची भीती वाटते वगैरे अनेक. प्रश्न हा आहे की गळ्यात मंगळसूत्र घालावं का नाही हा त्या स्त्रीचा वैयक्तिक प्रश्न असावा का? का नाही? इतक्या बेसिक मुद्द्यावर आपण अजूनही एवढी चर्चा करतो??? इतक्या घाणेरड्या comments करणारे पुरुष घरात आपल्या बायकांकडून काय काय अपेक्षा करत असतील?? आम्ही दैनंदिन मालिकांमध्ये जेव्हा असं काही लिहितो तेव्हा कुठल्या काळात जगता आहात, आता हे प्रश्न नाहीयेत लोकांचे वगैरे म्हणणाऱ्या सगळ्यांना मला सांगावं असं वाटतं की ते कॉमेंट्स वाचा. काळ बदलला आहे. विचार नाहीत. खूप मोठ्या प्रमाणावर बदललेले नाहीत. कित्येक कॉमेंट्स आम्ही डिलीट केल्या आहेत. कराव्या लागल्या.

हेही वाचा : मालिकेच्या निर्मात्याने थकवलेले पैसे, मृणाल दुसानिसने चार वर्षांनी ‘त्या’ घटनेवर केलं भाष्य, म्हणाली, “मी हळवी होऊन…”

मुग्धा गोडबोलेची पोस्ट

दरम्यान, मुग्धा गोडबोलेने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक महिलांनी कमेंट्स करत अशा अश्लील भाषेक दुसऱ्यांच्या व्हिडीओवर कमेंट्स करणं चुकीचं असल्याचं सांगितलं आहे. “सगळ्या सेलिब्रिटी, विशेषतः बायकांना प्रचंड ट्रोल करतात.”, “फार बीभत्स बोलतात काही लोक” अशा प्रतिक्रिया देत अनेक महिलांना क्षितीसह मुग्धाने शेअर केलेल्या पोस्टला पाठिंबा दर्शवला आहे.