Mukta Barve on Sabar Bonda film: गेल्या काही दिवसांत अनेक दर्जेदार मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. १२ सप्टेंबरला ‘बिन लग्नाची गोष्ट’, ‘आरपार’ व ‘दशावतार’ हे सिनेमे प्रदर्शित झाले होते. या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसली. आता १९ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘साबर बोंडं’ या सिनेमाचीदेखील मोठी चर्चा होताना दिसत आहे. मराठी प्रेक्षक, तसेच कलाकारांकडून सिनेमाचे कौतुक होत आहे.
आता लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वेने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले. तसेच हा चित्रपट पाहिल्यानंतर तिच्या मनात काय भावना होत्या हेदेखील तिने लिहिले आहे.
“थिएटरमध्ये बसून मला…”
मुक्ताने लिहिले, “एक सुंदर सिनेमा बघितला. ‘साबर बोंडं’ असं या चित्रपटाचं नाव आहे. लेखक-दिग्दर्शक रोहन कानवडे, त्याची सगळी टीम म्हणजे पडद्यावरचे -मागचे सगळे कलाकार, हा सुखद अनुभव दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.”
पुढे अभिनेत्रीने लिहिले, “कोणताही अभिनिवेश नसलेला, गणित मांडून चौकटीत न बसवलेला हा सिनेमा. मला अगदी नकळत, अलगद, थेट सिनेमाच्या आतल्या जगात घेऊन गेला. पडद्यावर कोणी अभिनय करतंय. असं वाटतच नव्हतं. थिएटरमध्ये बसून मला गोष्टीतल्या हवेतला गारवा जाणवला. नदीच्या पाण्याचा थंडपणा अंगात शिरला. उन्हाचा चटका लागला. अनवाणी चालताना काटाही रुतला आणि मी खऱ्या आयुष्यात कधीच न चाखलेल्या साबर बोंडाची चवही तृप्त करून गेली.”
पुढे या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारलेली अभिनेत्री जयश्री जगतापबद्दल मुक्ता बर्वेने लिहिले, “जयश्री माझी जवळची लाडकी मैत्रीण आहे. ती दोन तास मला आनंदची आईच वाटली. जयू, तुझं खूप कौतुक आणि प्रेम.”
“अभिमानानं मन भरून…”
प्रेक्षकांनी चित्रपट पाहावा, अशी इच्छा व्यक्त करीत अभिनेत्रीने लिहिले, “असं आतून आलेलं, चांगलं काम आपल्या भाषेत होताना बघितलं की, अभिमानानं मन भरून येतं. अमूर्त वाटणाऱ्या चांगल्या कल्पना नक्की सत्यात उतरतील, अशी खात्री वाटते. चांगलं काहीतरी करण्याचा हुरूप येतो. मोठ्या पडद्यावर एक सकस अनुभव घेण्यासाठी ‘साबर बोंडं’ नक्की बघा.”
मुक्ता बर्वेनं लिहिलेल्या पोस्टवर चित्रपटाचे दिग्दर्शक रोहन कानवडे यांनी कमेंट करीत तिनं चित्रपटाबद्दल लिहिलेल्या या पोस्टबद्दल मुक्ताचे आभार मानले आहेत अनेक चाहत्यांनीदेखील हा चित्रपट नक्की बघू, अशा अनेकविध कमेंट केल्या आहेत.
‘साबर बोंडं’ या चित्रपटाबद्दल बोलायचे तर, २०२५ मध्ये पार पडलेल्या सनडान्स फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाला ग्रँड ज्युरी पुरस्कार मिळाला आहे. आता चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.