Manjiri Oak Talks About Prasad Oak : प्रसाद ओक मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्याने अनेक नाटक, मालिका चित्रपटांत काम केलं आहे. यासह तो दिग्दर्शन व निर्मितीही करतो. यादरम्यान त्याला त्याची पत्नी मंजिरी ओकही सहकार्य करत असते. अशातच आता तिने नवऱ्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
मंजिरी ओकने नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये तिने प्रसाद ओकबरोबर काम करतानाचा अनुभव सांगितला आहे. यामध्ये मंजिरीला “२०-२२ वर्ष गृहिणी होतीस तू, त्यानंतर जेव्हा सेटवर जाऊन प्रसादबरोबर काम करायचं ठरवलं तेव्हा तुझा सेटवरचा पहिला दिवस आठवतोय का” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर मंजिरी म्हणाली, “सेटवरचा सोड, ऑफिसमधलाच पहिला दिवस ‘हिरकणी’ सुरू झालं तेव्हा त्याच्या प्रीप्रमोशनला मी काम करायला सुरुवात केलेली.”
मंजिरी ओकने सांगितला प्रसाद ओकबरोबर काम करण्याचा अनुभव
मंजिरी पुढे याबद्दल म्हणाली, “आमचे ‘हिरकणी’चे निर्माते राजेश मापुस्कर जर तिथे नसते तर मी रोज रडले असते. कारण प्रसाद दिग्दर्शक म्हणून खूप शिस्तप्रिय आहे. त्यानेच मला सांगितलेलं की तूसुद्धा जॉइन कर, ती फिल्म एका आईवर आधारीत आहे. सोनाली आणि तुझे संबंध चांगले आहेत तर तिला तुझी मदत होईल. तेव्हा त्याला मी म्हटलेलं की, मला काही येत नाही. तो म्हणाला शिकशील तू, मी म्हटलं हे बरोबर आहे, पण पहिल्या दिवशी तर नाही ना सगळं शिकणार मी. तर असंच एकदा मी ऑफिसमध्ये दरवाजा उघडून प्रसाद असं करून आतमध्ये गेले काहीतरी बोलायला, तेव्हा त्याने फक्त बघितलं माझ्याकडे. तेव्हा मला कळलं की मी काहीतरी माती खाल्ली आहे.”
प्रसादबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत मंजिरी पुढे म्हणाली, “बाहेर आले तेव्हा थोड्या वेळाने त्याने मला केबिनमध्ये बोलावलं आणि सांगितलं की, हे ऑफिस आहे घर नाहीये, त्यामुळे घरात किचनमधून ज्या आवाजात ओरडत माझ्याकडे येते तसं इथे ओरडू नकोस. मी असं नाही म्हणत की तू सर म्हण मला, पण किमान प्रसाद अशी नीट हाक दे, जोरात ओरडू नकोस; तर अशी त्याची बॉसगिरी पहिल्या दिवसापासूनच सुरू होती. पण, अर्थात मला कळत नव्हतं काही त्यातलं, पण राजेश सर असल्यामुळे त्यांनी मला बाजूला नेलं आणि समजावलं की, तो आता इथे बॉस आहे, त्यामुळे तो म्हणेल त्याला फक्त हो म्हणायचं. इथून ज्या दिवशी घरी जाशील तिथे तू दादागिरी कर. मी म्हटलं ओके सर.”
दरम्यान, मंजिरीचा दागिन्यांचा व्यवसायही आहे. यासह ती तिच्या नवऱ्याबरोबर चित्रपटांची निर्मितीही करते. अनेकदा ती त्याच्याबरोबर सेटवर त्याला मदतही करत असते.