बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणारा अभिनेता पुष्कर जोग(Pushkar Jog) सध्या विविध चित्रपटांची निर्मितीदेखील करताना दिसत आहे. लवकरच तो ‘हार्दिक शुभेच्छा’ या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री हेमल इंगळे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. पुष्कर जोग त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतोच, मात्र त्याच्या वक्तव्यांमुळेदेखील तो अनेकदा चर्चांचा भाग बनतो. अभिनेत्याने अनेकदा मराठी चित्रपटसृष्टीत सगळ्यांमध्ये एकी असली पाहिजे यावर वक्तव्य केले आहे. आता याआधी अनेकदा अभिनेत्याने मराठी चित्रपट ऑस्करमध्ये नेण्याच्या महत्त्वाकांक्षेबद्दल वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मला खूप राग येतो की…

अभिनेता पुष्कर जोगने नुकतीच ‘बातों बातों में’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याच्या मराठी चित्रपट ऑस्करमध्ये नेण्याच्या महत्त्वाकांक्षेबद्दल विचारले. यावर बोलताना अभिनेत्याने म्हटले, “एवढ्या वर्षांचा जो राग आहे किंवा मराठी इंडस्ट्री, मराठी प्रेक्षकांबद्दल मला जे प्रेम आहे, ज्या प्रेक्षकांनी मला प्रेम दिलं, मी महाराष्ट्रीय असल्याचा मला अभिमान आहे. मला खूप राग येतो की साऊथ इंडियन फिल्म किंवा बॉलीवूडवाले आपल्याला पाण्यात बघतात. ते विचार करतात, मराठी इंडस्ट्रीमधील लोक काय बनवणार. मी लंडनमध्ये फिल्म शूट करायला लागलो. माझी ‘ती अँड ती’ ही पहिली फिल्म होती, जी लंडनमध्ये शूट झाली. अनेकांनी परत तिथे शूटिंग केले. लंडनमध्ये शूटिंग करण्याचं कारणच हे होतं की मी भारती विद्यापीठात शिकलो. तिकडे मला दिल्ली, पंजाबमधील मुलं म्हणायचे की तुमच्या मराठी चित्रपटातील गाणी ही फिल्म सिटीमधील गार्डनमध्ये शूट होत असतील ना? तर ते माझ्या डोक्यात राहिलं.

मला असं वाटतं की, मराठी इंडस्ट्रीमध्ये जे टॅलेंट आहे ते दुसऱ्या कुठल्याच इंडस्ट्रीमध्ये नाहीये. कलाकार असो वा दिग्दर्शक, आपली मराठी इंडस्ट्री उत्तम आहे; फक्त आपल्याकडे बजेटची कमी आहे. एकी नाहीये, त्यामुळे मी ठरवलंय की मी एक चित्रपट नक्की करणार आहे. तो माझ्या पहिल्या चित्रपटाचा सिक्वेल आहे. ‘जबरदस्त २’ या चित्रपटाच्या स्क्रीप्टवर मी गेले दोन वर्ष काम करत आहे. मी मार्वेल्स तसेच अवेंजर चित्रपटांचा मोठा चाहता आहे. मला मानसिकता बदलायची आहे. जेव्हा राजामौली सर ऑस्करमध्ये जाऊन म्हणतात की, आरआरआर ही तेलुगु फिल्म आहे, ही त्यांच्या राज्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. मलासुद्धा तिकडे जाऊन म्हणायचं आहे की हा माझा मराठी चित्रपट आहे, जय हिंद जय महाराष्ट्र; हे मला ऑस्करच्या हॉलमध्ये जाऊन म्हणायचं आहे. मी प्रयत्न करतोय, त्यासाठी मी खूप मेहनत करतोय”, असे म्हणत ऑस्करमध्ये मराठी चित्रपट जावा, यासाठी प्रयत्न करत असल्याचे पुष्करने म्हटले आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pushkar jog on south indian film and bollywood perspective towards marathi industry says feel angry also talks about marathi films in oscar nsp