सध्या मराठीमध्ये विविध विषयांवर चित्रपटांची निर्मिती होत आहे. विनोदी, ऐतिहासिक, रोमँटिक यांसारख्या अनेक विषयांवर आधारित मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र अनेकदा या चित्रपटांना स्क्रीन मिळत नाही, अशी ओरड सुरु असते. नुकतंच याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मत व्यक्त केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज राज ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीत अमोल कोल्हे व अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंना काही प्रश्न विचारले. यावेळी अमोल कोल्हेंनी ‘मल्टीफ्लेक्समध्ये अजूनही लहान चित्रपटांना स्क्रीन मिळत नाही. गेल्या ३ वर्षांपासून अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मने मराठी चित्रपट खरेदी करण्यास नकार दिलाय, तर तुमचं यावर मत काय?’ असा प्रश्न राज ठाकरेंना विचारला होता. त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले.
आणखी वाचा : “देवेंद्र फडणवीस कधीच फिरायला नेत नाहीत”, अमृता फडणवीसांनी केली तक्रार, राज ठाकरे म्हणाले “तुमचे फोटो…”

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“काही महिन्यांपूर्वी अनेक चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याबरोबर माझी बैठक झाली होती. तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की मी तुम्हाला स्क्रीन मिळवून देऊ शकतो. मी तुम्हाला प्रेक्षक मिळवून देऊ शकत नाही. अनेक लोक माझ्याकडे येतात आणि मला सांगतात की आमचा चित्रपट चित्रपटगृहातून काढला. वेड सारखा चित्रपट काढला का? रितेश देशमुखांनी तिकडे जाऊन काही दमदाटी केली का? नाही ना.

चित्रपटगृहात एखादा मराठी चित्रपट लागला आहे आणि चित्रपटगृहाचा मालक तो विनाकारण काढून टाकतोय, मला हे प्लीझ दाखवा. जर तिथे दोन प्रेक्षक, चार प्रेक्षक असतील तर त्याच्याकडे पर्याय नसतो. पण कोणताही चित्रपटगृहाचा व्यावसायिक त्याच्याकडे चालत असलेला चित्रपट काढणार नाही. कधीच काढणार नाही. आपल्याकडे असलेला कंटेट हा फार महत्त्वाचा आहे. त्याचा योग्य वापर करणं गरजेचं आहे.

मी एखादा चित्रपट काढला तर त्याला स्क्रीन मिळायलाच हवी, असं होऊ शकत नाही. तुम्हाला दक्षिणेकडे चालणारे चार-पाच चित्रपट दिसतात, पण त्यांच्या पडलेल्या चित्रपटाकडे आपण पाहत नाही. जर तुम्ही दर शुक्रवारी दहा-बारा मराठी चित्रपट प्रदर्शित करणार असाल, तर कोणत्या चित्रपटगृहात ते लागतील.

जेव्हा मोठ्या बजेटचा चित्रपट येतो, तेव्हा त्याच्याबरोबर सगळ्याच गोष्टी येतात. त्याच्यासमोर आमचा चित्रपट लागला नाही, असं जर तु्म्ही म्हणतं असाल तर तो चित्रपटगृहाचा मालक नक्की काय करेल”, असे राज ठाकरेंनी यावेळी सांगितले.

आणखी वाचा : पत्नी की नातू, राज ठाकरे कोणाचं जास्त ऐकतात? शर्मिला ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या…

दरम्यान राज ठाकरे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांची भाषणं व मुलाखती कायमच चर्चेचा विषय असतात. नुकत्याच झालेल्या मुलाखतीत त्यांनी सामाजिक, राजकीय आणि कौटुंबिक विषयांच्या प्रश्नांवर चागंलीच फटकेबाजी केली.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray talk about marathi movie screen issue and multiplex screen issue said every friday many movie release nrp