Rajkummar Rao post for Aarpar : अभिनेता ललित प्रभाकर व अभिनेत्री हृता दुर्गुळे यांचा ‘आरपार’ चित्रपट रिलीज होऊन चार दिवस झाले आहेत. शुक्रवारी, १२ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘आरपार’ ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. याचदरम्यान बॉलीवूड अभिनेत्याने ‘आरपार’साठी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

‘आरपार’ या मराठी चित्रपटासाठी बॉलीवूड अभिनेता राजकुमार रावने इन्स्टाग्रामवर केलेली पोस्ट लक्ष वेधून घेत आहे. राजकुमार रावने शुक्रवारी प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट ‘आरपार’ला सोशल मीडियावरून खास पाठिंबा दिला आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करून त्याने “Running in theatres. Must watch guys. #AarPar” असं लिहिलं.

राजकुमार रावने या पोस्टमध्ये चित्रपटातील प्रमुख कलाकार ललित प्रभाकर, हृता दुर्गुळे आणि दिग्दर्शक गौरव पत्की यांना टॅग केलं.

पाहा पोस्ट-

राजकुमार राव पोस्ट (फोटो- इन्स्टाग्राम)

१२ सप्टेंबर रोजी रिलीज झालेला ‘आरपार’ हा प्रेम, विश्वास आणि भावनिक संघर्ष यांवर आधारित चित्रपट आहे. सध्या थिएटर्समध्ये या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. राजकुमार रावसारख्या लोकप्रिय अभिनेत्याने दिलेल्या या पाठिंब्यामुळे चित्रपट अधिक व्यापक प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मराठी चित्रपटसृष्टीने गेल्या काही वर्षांत दमदार कथा सांगण्याची परंपरा जपली आहे. अनेक बॉलीवूड कलाकार आता प्रादेशिक चित्रपटांना पाठिंबा देतात, त्यामुळे हे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. ‘आरपार’ सिनेमाचे दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद या सर्वांची धुरा गौरव पत्की यांनी सांभाळली आहे. प्रेमाची अनोखी परिभाषा मांडणारा हा रोमँटिक सिनेमा ऋता व ललित या नव्या जोडीसह सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.