Rinku Rajguru on Marriage: रिंकू राजगुरुच्या लग्नाबाबत अनेकदा चर्चा होताना दिसतात. तिचा जोडीदार कोण आहे, हे जाणून घेण्याचादेखील चाहते प्रयत्न करतात. आता स्वत: अभिनेत्रीने यावर वक्तव्य केले आहे.

लग्नाबाबत रिंकू राजगुरु काय म्हणाली?

रिंकू राजगुरूने नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या जोडीदाराबद्दल, तिच्या लग्नाबद्दल सोशल मीडियावर अफवा पसरतात,याबद्दल तिला प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, “मी अजून माझा जोडीदार म्हणून कोणी शोधला नाही किंवा मला अजून कोणी तसा मिळाला नाही की ज्याच्याशी मी लग्न करावं. आई-बाबा शोधतील. त्यांना कोणी आवडला आणि मलासुद्धा तो मुलगा आवडला तर लग्न करेन. “

पुढे रिंकू असेही म्हणाली, “मला जर कोणी आवडला तर मी आई-बाबांना सांगणार की हाच तो मुलगा आहे. जर तोपर्यंत मला तसा कोणी सापडला नाही तर आई-बाबा शोधतील त्या मुलाशी मी लग्न करणार.”

अभिनेत्री असेही म्हणाली की अगदी सुरुवातीला सोशल मीडियावर साडीतले फोटो शेअर केले होते, तेव्हा रिंकू राजगुरुचा साखरपुडा झाला, हा तिचा बॉयफ्रेंड आहे, अशा अफवा पसरल्या होत्या. आता अशा गोष्टींची सवय झाली आहे.

बॉडी शेमिंगबाबत रिंकू म्हणाली, “कोणाच्या दिसण्यावरुन बोलायला मला आवडत नाही. मी कधी कोणाला दिसण्यावरुन बोलत नाही. काही लोकांना आजार असतात. तर त्यांना पर्याय नसतो. वाईट दिसण्याची कोणाला हौस नसते. त्यांची त्यांची काही कारणं असतील आणि देवाने जसं दिलंय तसं स्वीकारावं. सगळेच त्यांच्या त्यांच्या परीने सुंदर असतात.”

याच मुलाखतीत तिला असेही विचारण्यात आले की रिंकू सेलिब्रिटी आहे पण ती फिल्मी किती आहे? यावर रिंकू म्हणाली, “मी अजिबात फिल्मी नाही. मी खूप भावनिक, संवेदनशील, अतिविचार मुलगी आहे. जशा सगळ्या बायकाच, मुली असतात तशीच मी आहे.”

दरम्यान, आगामी काळात अभिनेत्री कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.