Riteish Deshmukh Praises Kapil Honrao : स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेमधील लोकप्रिय अभिनेता कपिल होनराव रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या सिनेमात झळकणार आहे. कपिल हा रितेशचा मोठा चाहता असून, रितेशमुळेच तो अभिनय क्षेत्रात आला. लातूरमध्ये रितेशला पाहताच कपिलनं अभिनेता बनण्याचं स्वप्न पाहिलं आणि या क्षेत्रातला त्याचा प्रवास केला. कपिलनं नुकत्याच एका मुलाखतीतून त्याच्या या अनुभवाबद्दल सांगितलं होतं.

“२००३ मध्ये रितेश देशमुख यांचा ‘तुझे मेरी कसम’ हा हिंदी चित्रपट आला होता. या चित्रपटानंतर गावात बाईक रॅली निघाली होती. तेव्हा लाल टी-शर्ट, जीन्स व गॉगल अशा लूकमध्ये रितेशजी मला दिसले होते. त्यांना पाहिल्यानंतर माझ्या डोक्यात ‘आपणसुद्धा अभिनेता बनलं पाहिजे’, असा विचार आला होता” असं कपिल म्हणाला होता. ‘लोकमत फिल्मी‘ला दिलेल्या मुलाखतीत कपिलनं हा किस्सा शेअर केला होता.

कपिलच्या या मुलाखतीच्या व्हिडीओवर आता रितेशनं प्रतिक्रिया व्यक्त करीत त्याचं कौतुक केलं आहे. रितेश म्हणतो, “प्रिय कपिल, तुम्ही खूप छान अभिनेते आहात. तुमच्या कलेवर तुमचं प्रभुत्व आहे. तुमच्याबरोबर काम करताना मला खूप मजा आली. तुमची सर्व स्वप्नं पूर्ण होवोत हीच प्रार्थना. शूट बाकी आहे, लवकरच सेटवर भेटू…” रितेशच्या या प्रतिक्रियेनंतर कपिल भारावून गेला असून, त्यानंसुद्धा रितेशबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कपिल म्हणतो, “२४ जानेवारी २०२५ हा दिवस मी कधीच विसरू शकत नाही. जे मी महाराष्ट्रातली सुपरहिट मालिका देऊनसुद्धा करू शकलो नाही, ते तुमच्या एका व्हिडीओ कॉलमुळे शक्य झालं. माझ्या वडिलांच्या डोळ्यात सतत एक काळजी होती की, माझं कसं होणार. हे क्षेत्र आपल्यासाठी नाही. तू सरकारी नोकरी शोध, अजून वेळ गेली नाही; पण तुमच्या व्हिडीओ कॉलनंतर त्यांची काळजी मिटली.”

कपिल होनरावचं रितेश देशमुखने केलं कौतुक

कपिल होनराव इन्स्टाग्राम स्टोरी

पुढे कपिल म्हणतो, “आम्ही एकत्र काम करतोय हे वाक्य खूप मोठं आणि त्यांना समाधान देणार होतं. आज त्यांच्या डोळ्यांत माझ्यासाठी प्रेम आणि अभिमान पाहून मला आणखी मेहनत करायला ऊर्जा मिळतेय. कधीच कॉल न करणारे माझे बाबा आठवड्याला कॉल करतात आणि आवर्जून तुमच्याबद्दल विचारतात. तुमच्यात त्यांना साहेबांची झलक दिसते, हे ते आवर्जून सांगतात. साहेबांनी फक्त कार्यकर्ते जोडले नव्हते, तर जीवाभावाची माणसे जोडली होती आणि तुम्हीपण तेच करत आहात सर. लवकरच भेटू.”