Rujuta Deshmukh : टेलीव्हिजनवर गेल्या दोन दशकांपासून अधिराज्य गाजवणारी आणि आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री नहणजे ऋजुता देशमुख. झी मराठीवरील ‘कळत नकळत’ या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि अनेकांची मनं जिंकली. त्यानंतर ती ‘जाऊ नको दूर बाबा’, ‘तू माझा सांगाती’, ‘आनंदी हे जग सारे’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम ती प्रेक्षकांच्या भेटीस आली. सध्या ती स्टार प्रवाहवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साजिरी जोशीचं मनोरंजन क्षेत्रात पदार्पण

ऋजुता देशमुखला एक मुलगी असून तीसुद्धा आईच्या पावलावर पाऊल ठेवत मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. ऋजुताच्या मुलीचं नाव साजिरी असून ती रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटातून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करत आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. काही दिवसांपुर्वी साजिरीचे या चित्रपटातील ‘जाई’ भूमिकेचे खास पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं. अशातच आज ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटातील गाणं प्रदर्शित झालं आणि याचा खास सोहळा नुकताच पार पडला.

ऋजुता देशमुखकडून लेकीला पदार्पणाबद्दल शुभेच्छा

या खास सोहळ्यासाठी बॉलीवूड अभिनेते बोमन इराणींनी हजेरी लावली होती. यावेळी ऋजुताने आपल्या लेकीच्या पदार्पणाबद्दल भावना व्यक्त केल्या. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत ऋजुताने लेकीविषयी असं म्हटलं की, “आई म्हणून लेकीसाठी आनंदी आहे. तिचे हे दिवस मी सध्या एण्जॉय करत आहे. गेल्या तीन-चार वर्षांत तिची या क्षेत्रात येण्याची इच्छा नव्हती, किंबहुना तिचीही नव्हती. पण तिने चंद्रकांत कुलकर्णींबरोबर एक टेलीफिल्म केली. तेव्हा आम्हाला जाणवलं की, तिच्यात अभिनयाची चुणूक आहे.”

साजिरी जोशीने पदार्पणबद्दल व्यक्त केल्या भावना

यापुढे ऋजुताने असं म्हटलं की, “घरी मिमीक्री वगैरे सुरूच असायची. पण मला वाटलं नव्हतं की, ती अभिनेत्री होण्याचे स्वप्न बघेल.” यानंतर ऋजुताने लेकीच्या पहिल्या चित्रपटाबद्दल असं म्हटलं की, “खरंतर आईने मुलीचं कौतुक करू नये. मुलीचं कौतुक बघावं. तिचा हा पहिलाच चित्रपट आहे त्यामुळे साहजिक मी आनंदी आहेच.” तर साजिरीनेही तिच्या पहिल्या चित्रपटाबद्दल आनंदी भावना व्यक्त केल्या. यावेळी साजिरीने असं म्हटलं की, “खूप उत्सुकता आहे, शिवाय जबाबदारी आणि दडपणही आहे की, इतके मोठे लोक आपल्याला शुभेच्छा देत आहेत. पण मज्जाही येत आहे.”

साजिरी जोशीच्या ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाबद्दल…

रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटात (कृष्णा) आर्यन मेंगजी, प्रसाद (श्रेयस थोरात) व (सिद्धेश) मंथन काणेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर त्यांच्याबरोबर (जाई) साजिरी देशमुखही प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यात हुशार, समजुतदार, गोड, दिलखुलास अशी जाई या तीन मित्रांबरोबर उन्हाळ्याच्या सुट्टीत धमाल करताना दिसत आहे. दरम्यान, येत्या मे महिन्याच्या सुट्टीत म्हणजेच १६ मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rujuta deshmukh expresses feelings for her daughter sajiri joshi first movie april may 99 ssm 00