Shubhangi Sadavarte And Anand Oak Divorce : ‘संगीत देवभाबळी’ या सुप्रसिद्ध नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शुभांगी सदावर्तेचा घटस्फोट झाला आहे. शुभांगी व आनंद ओक पाच वर्षांच्या संसारानंतर विभक्त झाले आहेत. आनंद यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

अभिनेत्री शुभांगी सदावर्ते व संगीतकार आनंद ओक यांनी २०२० मध्ये लग्नगाठ बांधली होती. मात्र, आता लग्नानंतर पाच वर्षांनी आनंद ओक यांनी घटस्फोटाची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

“प्रिय मित्रांनो, मी आणि शुभांगीने काही वर्षांपूर्वीच परस्पर सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. हे स्वीकारण्यास आम्हालाही थोडा वेळ लागला पण, आता हा निर्णय जाहीर करण्याची योग्य वेळ आली आहे. आम्ही जे क्षण एकत्र घालवले त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. याचबरोबर मी शुभांगीला तिच्या भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. ती उत्तम अभिनेत्री आणि खूप चांगली व्यक्ती आहे. भविष्यात जेव्हा संधी मिळेल, तेव्हा आम्ही एकत्र काम करत राहू…जसं आम्ही यापूर्वीही एकत्र काम केलेलं आहे.” असं आनंद ओक यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

शुभांगी आणि आनंद यांचा लग्नसोहळा करोना काळात पार पडला होता. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर शुभांगी आणि आनंद लग्नबंधनात अडकले होते. त्यांच्या लग्नाला जवळचे नातेवाईक व मोजके मित्रमंडळी उपस्थित होते. आता दोघांनाही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, ‘संगीत देवबाभळी’ या नाटकात शुभांगी सदावर्ते आवलीची भूमिका साकारते. तिने साकारलेल्या आवलीच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं आहे. अनेक बॉलीवूड कलाकारांनी सुद्धा ‘संगीत देवबाभळी’ हे नाटत आवर्जून पाहिलं आहे. या नाटकासह शुभांगी ‘नवे लक्ष्य’ या मालिकेत सुद्धा झळकली आहे. याचबरोबर ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमात सुद्धा तिने लक्ष्मीबाईंची भूमिका साकारली होती.