Satish Shah messaged Sachin Pilgaonkar before Death: विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचं किडनी निकामी झाल्याने निधन झालं. सतीश यांच्या निधनाने अनेक कलाकारांना धक्का बसला आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर यांनीही सतीश शाह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच मृत्यूच्या काही तासांआधी सतीश शाहांनी आपल्याला मेसेज केला होता, असं पिळगांवकरांनी सांगितलं.
सतीश शाहांनी मराठी चित्रपटांमध्येही काम केलं होतं. सचिन पिळगांवकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘गंमत जंमत’ मध्ये सतीश शाहांनी भूमिका केली होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सतीश शाह व सचिन पिळगांवकर यांची मैत्री झाली. न्यूज१८ शोशाला दिलेल्या मुलाखतीत सचिन यांनी सतीश शाहांच्या आठवणी सांगितल्या.
“आम्हाला एकत्र काम करण्यासाठी एक फक्त निमित्त हवं होतं. १९८७ साली आलेल्या गंमत जंमतनंतर आम्ही पुन्हा कधीही एकत्र काम केलं नाही. पण त्या सिनेमाच्या सेटवर आमची घट्ट मैत्री झाली. सतीश, त्याची पत्नी मधू, सुप्रिया आणि मी खूप जवळचे मित्र झालो. आम्ही महिन्यातून किमान दोन किंवा तीन वेळा भेटायचो. गंमत जंमतनंतर पुन्हा एकत्र काम केलं नाही, पण त्याचा आमच्या मैत्रीवर परिणाम झाला नाही,” असं सचिन पिळगांवकर म्हणाले.
पत्नीची काळजी घेण्यासाठी किडनी ट्रान्सप्लांट
“सतीश आणि मधू खूप उत्साही आणि प्रेमळ होते. आम्ही त्यांना आमच्या सर्व चित्रपट प्रीमियरमध्ये आमंत्रित करायचो. ते स्क्रीनिंगला, पार्ट्यांना यायचे. ते नेहमीच आमच्या गेस्ट लिस्टमध्ये असायचे. त्यांच्याशिवाय आम्ही काहीही सेलिब्रेट करायचो नाही. आता त्यांच्याशिवाय आम्ही कार्यक्रम कसे करू हा विचार मला येतोय. दुर्दैवाने, मधूचीही प्रकृती बरी नाही. तिला अल्झायमर आहे. या वर्षी सतीशचे किडनी ट्रान्सप्लांट झाले. त्याला त्याची पत्नी मधूची काळजी घेण्यासाठी जगायचं होतं. तो डायलिसिसवर होता. त्यापूर्वी, त्याची बायपास सर्जरी यशस्वी झाली होती,” असं सचिन पिळगांवकर यांनी सांगितलं.
सतीश शाहांनी निधनाआधी केलेला सचिन पिळगांवकरांना मेसेज
सुप्रिया पिळगांवकर तीन दिवसांपूर्वीच सतीश आणि मधूला भेटायला गेल्या होत्या, असं सचिन यांनी सांगितलं. “मी शूटिंगमध्ये व्यग्र असल्याने जाऊ शकलो नाही. त्यांनी छान म्युझिक लावलं आणि सुप्रिया व मधूने डान्स केला. खरं तर, मला दुपारी १२:५६ वाजता त्याचा मेसेज आला, म्हणजे त्यावेळी तो पूर्णपणे ठीक होता. मी धक्क्यात आहे. इंडस्ट्रीचे मोठे नुकसान झाले आहे. हे माझे खूप मोठे वैयक्तिक नुकसान आहे. आयुष्याचा काहीच भरवसा नाही, त्याबद्दल आपण अंदाज बांधू शकत नाही. त्यामुळे आनंदी राहा आणि आजूबाजूच्या लोकांना आनंदी ठेवा,” असं सचिन पिळगांवकर म्हणाले.
