अभिनेते शरद पोंक्षे यांनी विनोदी, गंभीर, नायक, खलनायक अशा वेगवेगळ्या भूमिकांमुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. कधी नाटक, कधी मालिका, तर कधी चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आपल्या अभिनयाबरोबरच शरद पोंक्षे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेही नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच शरद पोंक्षे अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा मस्ती पॉडकास्ट’मध्ये सहभागी झाले होते. त्यांचा दुसरा भाग कालच प्रदर्शित झाला. या दुसऱ्या भागात शरद पोंक्षे यांनी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची माफी मागितल्याचा किस्सा सांगितला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॅन्सरशी झुंज देताना शरद पोंक्षे यांनी दुसऱ्या बाजूला काय केलं हे सांगितलं. ते म्हणाले, “२५ वर्षं धावलो आणि एक वर्ष घरात बसलो. याच्यातून बाप्पा कुठेतरी मला सांगतोय, विचार कर. आतापर्यंतच्या ५२ वर्षांच्या आयुष्याचा विचार कर. काय चुकलास? काय नाही चुकलास? कोणाला दुखावलंस? त्या एक वर्षात मी संध्याकाळी घरी एकटा असायचो. सगळे घरातले कामानिमित्त बाहेर जायचे. मग मी अशा वेळी शांतपणे विचार करायचो. मालिका, सिनेमे, नाटकं, भांडणं या सगळ्यांचा विचार करायचो. मग भांडणं झालेल्या चार-पाच जणांनी नावं काढली. त्यांना फोन लावले.”

हेही वाचा – “…म्हणून मी कॅन्सरची लढाई जिंकलो”, शरद पोंक्षेंनी सांगितलं कारण; म्हणाले, “बांगलादेशी मुलीने…”

पुढे पोंक्षे यांनी एक घटना सांगितली आणि सोनालीची माफी मागण्याचं कारण स्पष्ट केलं. ते म्हणाले, ” ‘संस्कृती कलादर्पण’ने मला पुरस्कार दिला होता. नथुराम गोडसे या नाटकाचे ७०० प्रयोग झाल्यानंतर लक्षवेधी अभिनेता म्हणून त्यांनी मला पुरस्कार दिला. ७०० प्रयोग लागले लक्ष वेधून घ्यायला; मग सर्वोकृष्ट अभिनेत्यासाठी मला अजून ७०० प्रयोग करावे लागणार, असं भाषण मी केलं होतं. मी तिथे खूप बोललो. म्हटलं की, तुम्ही जे काही पुरस्कार सोहळे करता, ते इतके रटाळ व कंटाळवाणे असतात. तेच तेच झालंय. असे दोघे कोणीतरी येतात आणि समोर दिलेलं सगळं वाचतात. मग पुढे बोलत असताना मला खाली बिचारी सोनाली कुलकर्णी दिसली. म्हटलं की, या बिचाऱ्या सोनाली कुलकर्णीसारख्या पोरी वर्षानुवर्षं त्याच त्याच गाण्यावर तसंच्या तसं नाचतात. हे जरा बदला. जे कोणी ‘कलर्स’वाले आहेत, त्यांना माझी विनंती आहे की, हा पॅटर्न बदला.”

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबबरोबर अफेअरच्या चर्चा, निमिषने सोडलं मौन; म्हणाला, “आम्ही…”

हेही वाचा – Video: पावभाजी आणि फूड ट्रकनंतर आता ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम सुप्रिया पाठारे लवकरच घेऊन येतायत…

“याला दोन-तीन महिने गेले. माझ्या डोक्यात आलं की, मी उगीच त्या सोनाली कुलकर्णीला मधे बोललो. माझा रोख तिला दुखावण्याचा नव्हता. माझं मत होतं की, फक्त पॅटर्न बदला. कारण- त्या पुरस्कार सोहळ्यात ते कोणी दोघं अद्वितीय असं काही निवेदन करतात की, ते कंटाळवाणं, रटाळ असतं. मेकअप रूममधले किस्से सांगतात; ज्याचा प्रेक्षकांशी काही संबंध नसतो. मग आपले सगळे कलाकार ओरडत असतात. म्हणून मी त्या दिवशी त्या सोहळ्यात सगळं बोललो. त्यामुळे खूप लोक नाराज झाले. पुरस्कार घेतो आणि आपली अब्रूही काढतो, असं म्हणाले होते.”

हेही वाचा – Sahkutumb Sahparivar: “…तर आम्ही सगळे त्याला पोकळ बांबूचे फटके देणार”; असं अवनी वैभवला का म्हणाली?

पुढे पोंक्षे म्हणाले, “ही घटना आठवल्यानंतर मग मी सोनालीला फोन लावला. सोनालीला म्हटलं, कधीपासून मनात होतं. मला माफ कर. तुला अजिबात दुखवायचं नव्हतं. मला त्या पुरस्कार सोहळ्याच्या पॅटर्नचा कंटाळा आलाय आणि तो बदला, असं म्हणायचं होतं. मला जुनी नाट्यदर्पण रजनी आठवली गं. रजनी संध्याकाळी ८ वाजता सुरू व्हायची आणि पहाटे ५ वाजता संपायची. इथल्या पुरस्कार सोहळ्यात ते कानाला माईक वगैरे लावून माणसं आहेत. तरीही चुकीचं व्यवस्थापन असतं. असं नसतानाही ‘रजनी पुरस्कारा’चं परिपूर्ण व्यवस्थापन केलं गेलं होतं. २५ वर्ष त्यांनी ते केलं. हे सगळं मला बोलायचं होतं; पण त्यात तू दिसलीस. मला तुला दुखवायचं नव्हतं. मी तुझी क्षमा मागण्यासाठीच हा फोन केला. हे ऐकून सोनाली म्हणाली, ‘अरे दादा. तू प्लीज असं काही बोलू नकोस.’ तिच्या मनात काही राहायला नको म्हणून त्या वेळेस मी तिला फोन करून बोलून मोकळा झालो.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad ponkshe apologized to sonali kulkarni know reason pps