Supriya Pathare : वैयक्तिक आयुष्यात कितीही अडचण आली, कितीही संकटे आली तरी ते सगळं बाजूला सारून प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या मनोरंजनासाठी कलाकार मंडळी ‘द शो मस्ट गो ऑन’ म्हणत कायमच तत्पर असतात. ‘शो मस्ट गो ऑन’ हे इंग्रजीतलं वाक्य कलाकारांच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेचं वर्णन करण्यासाठीच वापरलं जातं. याचा अर्थ असा की, कितीही अडचणी किंवा शारीरिक त्रास असला तरी कलाकार आपलं काम चालू ठेवतात.
अशाच एका मराठी अभिनेत्रीने हात फ्रॅक्चर झालेला असूनही ‘द शो मस्ट गो ऑन’ म्हणत नाटकाचा प्रयोग पूर्ण केला होता, या अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे. अभिनेत्री क्रांती रेडकरने सुप्रिया पाठारेंचा हात फ्रॅक्चर झाल्याचा किस्सा सांगितला आहे. मिरची मराठीला दिलेल्या मुलाखतीत क्रांती असं म्हणाली, “‘तू तू मी मी’ हे खूप हिट नाटक होतं. त्यात मी विजय चव्हाण, भरत जाधव, अंकुश चौधरी आणि सुप्रिया पाठारे होतो. त्या नाटकात विजय चव्हाण १७ ते १४ भूमिका करायचे. त्या नाटकादरम्यान नागमोडी लोखंडी जिने असतात, त्यावरून सुप्रिया पडली होती.”
यानंतर तिने सांगितलं, “त्या नाटकाच्या प्रयोगांचा दौरा नुकताच सुरू झाला होता आणि एका प्रयोगात सुप्रिया पाठारे एन्ट्रीला जिन्यांवरून पडली होती. त्यात तिचा हात मोडला होता. मग आम्ही तो प्रयोग थांबवला आणि प्रेक्षकांमध्ये कोणी डॉक्टर आहेत का? असं विचारलं. तर एक डॉक्टर आले आणि त्यांनी तिला दुखू नये म्हणून हाताला टॉवेलसारखी एक शाल बांधली. तेव्हा आम्ही प्रेक्षकांना विनंती केली होती की, आम्ही प्रयोग पुढे सुरू करतो, पण सुप्रियाला आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे.”
क्रांती रेडकर इन्स्टाग्राम पोस्ट
यानंतर क्रांतीने सांगितलं, “तेव्हा सुप्रिया म्हणाली, “नाही नाही. मी प्रयोग पूर्ण करून हॉस्पिटलला जाईन आणि सुप्रियाने तुटलेला हात धरून अखंड प्रयोग केला. त्यापुढे नाटकात तिचे कपडे आठवेळा बदलण्यात यायचे. तेव्हा मग मी माझं सगळं सांभाळून तिला मदत करायची, कारण तेव्हा बॅकस्टेजला कोणी महिला नसायच्या. पण, त्यावेळी तिची तयारी करून ती एका विंगेतून जायची. मग अंकुश आणि भरत तिला सुरक्षितपपणे स्टेजवर घेऊन जायचे.”
सुप्रिया पाठारे इन्स्टाग्राम पोस्ट
यापुढे क्रांती म्हणाली, “आम्ही तो शो कसा केला आम्हाला माहीत. त्यानंतर पुढचे चाळीस दिवस तिच्या हाताला प्लास्टर असूनही आम्ही त्या नाटकाचा दौरा पूर्ण केला. त्यावेळी नाटकात आम्ही तिला सगळी मदत केली. त्या दौऱ्यादरम्यान आम्ही दोघी एकमेकींसाठी सगळं काही होतो, त्यामुळे नाटक तुम्हाला अभिनय शिकवतोच; पण माणूस म्हणून एकमेकांसाठी कसं उभं राहिलं पाहिजे हेही शिकवतो, असे नाटकाचे अनेक किस्से आहेत.”