Thappa Marathi Film Starcast : हिंदीमधल्या मल्टीस्टारर चित्रपटांना टक्कर देईल असा बिग बजेट, अप्रतिम कथानक असलेला आणि एकापेक्षा एक दमदार कलाकारांना एकत्र घेऊन एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिड विंचूरकर या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. यामध्ये ७ लोकप्रिय कलाकार एकत्र झळकणार आहेत. हा सिनेमा नेमका कसा असेल, याचं नाव काय आहे जाणून घेऊयात…

मराठी चित्रपटसृष्टीत नुकतीच ‘थप्पा’ या एका भव्य आणि हटके मल्टीस्टारर चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘थप्पा’चं सिनेमाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे ती म्हणजे त्याची ड्रीम स्टारकास्ट. चित्रपटाचं कथानक नेमकं काय आहे? यामधून मैत्री, प्रेमकथा, फसवणूक, सूड किंवा काहीतरी वेगळं रहस्य उलगडणार, हे अजून गुलदस्त्यातच आहे. ‘थप्पा’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी सर्वांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

“आम्ही येतोय तुम्हाला द्यायला मैत्रीचा थप्पा” असं कॅप्शन देत या सिनेमात झळकणाऱ्या कलाकारांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

सिनेमात झळकणार ‘हे’ कलाकार

वैदेही परशुरामी, रिंकू राजगुरू, सिद्धार्थ बोडके, गौरव मोरे, सखी गोखले आणि साईंकित कामत हे लोकप्रिय आणि दमदार कलाकार या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र पडद्यावर झळकणार आहेत. याशिवाय फोटोत एका प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. हा इन्फ्लुएन्सर आहे डॅनी पंडित. तो सुद्धा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसेल.

या सर्व कलाकारांनी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली असून इतकी मोठी स्टारकास्ट एकत्र पाहण्याची संधी या निमित्ताने प्रेक्षकांना मिळणार आहे. नवे चेहरे, नवे जोडीदार असल्याने यात नवीन केमिस्ट्री पाहायला मिळेल, त्यामुळे हा अनुभव खऱ्या अर्थाने वेगळा आणि थरारक ठरणार आहे.

दिग्दर्शक सिड विंचूरकर म्हणतात, “सध्या तरी अनेक गोष्टी गोपनीय असून ताकदीच्या स्टारकास्टमुळे हा सिनेमा प्रेक्षकांवर भव्य ठसा उमटवेल, याची खात्री आहे. चित्रीकरण लवकरच सुरू होणार असून संपूर्ण टीम अत्यंत उत्साही आहे. प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन आणि प्रभावी घेऊन येत आहोत.”