प्रिया बापट आणि उमेश कामत यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. चित्रपट, मालिका, नाटक या तिन्ही माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. प्रिया-उमेश ‘जर तरची गोष्ट’या नव्या नाटकाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ‘नवा गडी नवं राज्य’ या गाजलेल्या नाटकानंतर जवळपास १० वर्षांनी दोघेही पुन्हा एकदा रंगभूमीवर एकत्र आले आहेत. प्रिया-उमेश गेली १७ ते १८ वर्ष एकमेकांबरोबर आहेत. नुकतच एका मुलाखतीत उमेशने प्रियामधील त्याला आवडणारा गुण सांगितला आहे.
हेही वाचा- एव्हरग्रीन अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचं शिक्षण माहितेय? जाणून घ्या
उमेश म्हणाला, “मला प्रियाची एनर्जी आणि तिचं डेडिकेशन खूप आवडतं. एक प्रोजेक्ट घेतलं की हात धुवून ती त्याच्या मागे पडते. मी कधी कधी गोष्टी हलक्यात घेतो. आज नाही सापडल्या गोष्टी तर उद्या सापडेल. उद्या नाही सापडल्या तर परवा सापडेल पण तिला ते आज सापडायचं असतं. ती ज्या पद्धतीने एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवते ती गोष्ट मला जास्त आवडते”
दरम्यान, ‘जर तरची गोष्ट’ या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत, पल्लवी अजय, आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. नाटकाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून, दिग्दर्शन अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील यांनी केले आहे. ५ ऑगस्टपासून हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.