Kapil Sharma : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर महिन्याभरात दोनवेळा गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. कपिल शर्माच्या ‘कॅप्स कॅफे’वर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर खळबळ उडाली होती. कॅफेवर पहिल्यांदा गोळीबार झाल्याची घटना घडल्यानंतर त्या गोळीबाराची जबाबदारी कथितपणे खलिस्तानवादी हरदिप सिंग उर्फ लड्डीने घेतल्याचा दावा समोर आला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतल्याचा दावा करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होतं.
दरम्यान, कथितपणे लॉरेन्स बिश्नोई गँगमधील एका सदस्याकडून सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट करण्यात आली होती. कपिल शर्माच्या कॅफेवर महिन्याभरात दोनवेळा गोळीबार झाल्यानंतर आणि कथितपणे धमकी देण्यात आल्यानंतर मुंबई पोलिसांनी खबरदारी म्हणून मोठं पाऊल उचललं आहे. कपिल शर्माच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
सोशल मीडियावरील पोस्ट होती चर्चेत
लॉरेन्स बिश्नोई गँगमधील एका सदस्याकडून सोशल मीडियावर पोस्ट करत कपिल शर्माच्या कॅफेवरील हल्ल्याची कथितपणे जबाबदारी घेण्यात आली होती. त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, “जय श्री राम, सत श्री अकाल, सर्व भावांना राम-राम. कपिल शर्माच्या सरे येथील कॅप्स कॅफेवर जी फायरिंग झाली त्याची जबाबदारी गोल्डी ढिल्लों आणि लॉरेन्स बिश्नोई गँग घेते. आम्ही त्याला फोन केला होता, पण त्याने फोन उचलला नाही, त्यामुळे कारवाई करावी लागली. जर अता देखील उत्तर मिळालं नाही तर पुढील अॅक्शन लवकरत मुंबईमध्ये होईल,” असं त्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
कथित ऑडिओ क्लिप झाली होती व्हायरल
कथित व्हायरल ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीचा एक सदस्याने थेट धमकी दिल्याची माहिती समोर आली होती. “सलमान खानसोबत काम करणाऱ्या प्रत्येकाचं असंच होईल”, अशी धमकी दिली होती. तसेच कथित ऑडिओ क्लिपमध्ये असंही म्हटलं होतं की, “कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार करण्यात आला, कारण त्याने सलमान खानला त्याच्या कॅफेच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केलं होतं.”