सिने इंडस्ट्रीत फक्त सिनेमे बनत नाहीत, तर तिथे कलाकारांमध्ये घट्ट मैत्री आणि कट्टर दुश्मनीदेखील पहायला मिळते. कॅमेऱ्याच्या मागे बऱ्याच गोष्टी घडत असतात. कोणाचं अफेअर होतं, कोणाचं ब्रेकअप होतं, कोणाला सुख-दुःखं शेअर करणारा घट्ट मित्र मिळतो, तर कोणामधील शत्रुत्व त्यांना बरबाद करून सोडतं.

बॉलीवूडमधील असे अनेक किस्से आहेत. ७०-८० च्या दशकातील टॉपच्या अभिनेत्री मुमताज व दुसऱ्या शर्मिला टागोर यांच्याशी संबंधित एक किस्सा आहे. दोघींमधल्या दुश्मनीचे किस्से आजही चर्चेत आहेत. अलीकडेच मुमताज यांनी याबद्दल उघडपणे सांगितले आणि शर्मिला टागोरशी माझा काहीही संबंध नसल्याचे सांगितले.

विकी लालवानी यांच्या मुलाखतीत, जेव्हा मुमताज यांना त्यांच्या आणि शर्मिला टागोर यांच्यातील तुलनेबद्दल विचारण्यात आले, तेव्हा मुमताज म्हणाल्या, “यात स्पर्धा करण्यासारखे काय आहे? माझा शर्मिला टागोरशी काहीही संबंध नव्हता. तीदेखील एक टॉपची अभिनेत्री होती आणि मीही होते.” मुमताज यांनी असेही म्हटले आहे की, त्यांनी शर्मिलापेक्षा जास्त पुरस्कार जिंकले आहेत.

मुमताज म्हणाल्या, “मला वाटतं की, मी जितके पुरस्कार जिंकले आहेत, ते शर्मिलापेक्षा जास्त आहेत. मी जास्त पुरस्कार जिंकले आहेत. आम्ही दोघीही सुंदर होतो; मग मला तिचा हेवा का वाटेल? मला तिचा कधीच हेवा वाटला नाही. लोक असे का विचार करतात हे मला समजत नाही.”

सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला, तेव्हा त्यांनी शर्मिलाशी संपर्क साधला होता का, असे मुमताज यांना विचारण्यात आले. मग मुमताज म्हणाल्या, “नाही, मी त्यांना फोन केला नाही. मी कोणालाही फोन करीत नाही. मी लंडनमध्ये राहते आणि माझा नवरा जिथे जातो, तिथे मी केनिया, युगांडा असे सर्वत्र जाते. मी सहा महिन्यांतून एकदाच मुंबईत येते. कारण- माझा जन्म येथे झाला आहे आणि मला भारत खूप आवडतो. मी जी काही आहे, ती भारतीयांकडून मिळालेल्या प्रेमामुळे आहे.”

शर्मिला टागोर व मुमताज या दोघींमध्ये एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे दोघांनीही राजेश खन्नासोबत हिट चित्रपट दिले. जेव्हा मुमताज यांना याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्या म्हणाल्या, “माझे आणि राजेश खन्ना यांचे स्टार मॅच करीत होते. म्हणूनच आम्ही दोघांनी एकत्र इतके चित्रपट केले.”

मुमताज यांना जेव्हा सांगितले गेले की, शर्मिला यांनीही त्यांच्यासोबत हिट चित्रपट दिले आहेत. तेव्हा मुमताज म्हणाल्या, “तिने राजेश खन्नासोबत किती चित्रपट केले आणि मी किती? ते मोजा. तिने राजेश खन्नासोबत खूप कमी चित्रपट केलेत. मी त्यांच्यासोबत कमीत कमी १०-१५ चित्रपट केले आणि ते सर्व हिट झाले; एकही फ्लॉप झाला नाही. आमची सर्व गाणी हिट झाली. राजेश खन्ना आणि मी चांगले मित्र झालो होतो. ते प्रत्येक अभिनेत्रीशी मैत्री करीत नव्हते; पण शर्मिलाजींसोबत त्यांचे चांगले संबंध होते.”

राजेश खन्ना यांच्याशी असलेल्या त्यांच्या नात्याबद्दल बोलताना मुमताज म्हणाल्या, “मी आणि राजेशजीं आम्हा दोधांमध्ये खूप छान केमिस्ट्री होती आणि आम्ही शूटिंगपूर्वी गाण्यांचा सराव करायचो. माझे राजेश खन्ना यांच्याशी चांगले संबंध होते. माझे धर्मेंद्र यांच्यासोबतही चांगले संबंध आहेत. ते एक चांगले व्यक्ती आहेत.”