House Arrest host Ajaz Khan Controversy : अभिनेता एजाज खान मागील काही दिवसांपासून ‘हाऊस अरेस्ट’ या शोमुळे वादात अडकला आहे. ullu App वरील या शोचा होस्ट असलेल्या एजाजने स्पर्धकांना कपडे काढायला सांगितलं होतं, तसेच अश्लील कृत्ये करायला लावली होती. याच शोसंदर्भात एका महिलेने तक्रार दिली आहे. तिने होस्ट एजाज खानवर बलात्काराचा आरोप करत तक्रार नोंदवली आहे.

अभिनेता एजाज खानने बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. त्याने लग्नाचे आणि त्याच्या ‘हाऊस अरेस्ट’ या शोमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून अत्याचार केला, अशी तक्रार महिलेने दिली आहे. याप्रकरणी मुंबईतील चारकोप पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘हाऊस अरेस्ट’ या शोमध्ये अशील कंटेंट दाखवल्याबद्दल आधीच एजाज खानविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर आता या महिलेच्या तक्रारीनंतर एजाज पुन्हा एकदा वादात अडकला आहे.

इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, आज (५ मे रोजी) त्याच्याविरुद्ध वेगळा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. कलाकार महिलेच्या तक्रारीनंतर चारकोप पोलिसांनी एजाज खानविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, एजाज खानने तिला त्याच्या ‘हाऊस अरेस्ट’ शोमध्ये होस्टची भूमिका ऑफर करण्यासाठी फोन केला होता. शूटिंग दरम्यान, एजाजने आधी तिला प्रपोज केलं आणि नंतर तिच्या घरी गेला. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

या घटनेनंतर तिने चारकोप पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 64, 64(2M), 69 आणि 74 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एजाज खानला अटक होण्याची शक्यता आहे.

एजाज खान ‘हाऊस अरेस्ट’मुळे वादात

ullu App वर प्रदर्शित होणाऱ्या Hous Arrest या शोमुळे एजाज खान वादात अडकला आहे. या शोच्या काही भागांमध्ये स्पर्धकांना एजाज खाननं अश्लील कृत्य करण्यास लावल्याच्या व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. या क्लिपमध्ये एजाज खान स्पर्धकांना कपडे काढण्यास आणि सेक्स पोजिशन दाखवण्यास सांगताना दिसत होता. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद झाला. याप्रकरणी वातावरण तापल्यावर ullu App ने या शोचे सर्व एपिसोड हटवले आणि माफीही मागितली. आता याच शोमध्ये काम देण्याचं आमिष दाखवून एजाजने बलात्कार केल्याची तक्रार महिलेने केली आहे.