बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या चांगलाच चर्चेत आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे, त्याची नुकतीच आलेली The Ba***ds of Bollywood ही सीरिज. आर्यन खान दिग्दर्शित ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सीरिज प्रदर्शित होताच त्यातील एका दृश्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.

समीर वानखेडेंसारखी एक भूमिका या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. ही भूमिका साकारणारा अभिनेतासुद्धा हुबेहूब वानखेडेंसारखाच दिसतोय. पहिल्या भागाच्या सुरुवातीला NCG नावाच्या एका संस्थेतील खूपच उत्साही अधिकारी एका पार्टीत येतो. तिथे तो अमली पदार्थाचं सेवन करणाऱ्या डीजे (सीरिजमधील पात्राचं नाव) पाहतो आणि लगेच त्याला अटक करण्याचा प्रयत्न करतो.

मात्र, डीजे स्पष्ट करतो की तो बॉलीवूड इंडस्ट्रीचा भाग नाही. हे समजताच तो NCG अधिकारी निराश होतो. त्यानंतर डीजे एका अभिनेत्याकडे बोट दाखवत तो बॉलीवूड इंडस्ट्रीमधील असल्याचं NCG अधिकाऱ्याला सांगतो. यानंतर अधिकारी त्या अभिनेत्याला अटक करतो.

या सीनमध्ये संबंधित अधिकाऱ्याचं नाव कुठेही स्पष्टपणे दिलं गेलेलं नाही. शेवटच्या क्रेडिटमध्ये त्याला फक्त ‘प्लेन क्लोथ कॉप’ (सामान्य कपड्यांतील पोलिस) असं म्हटलं आहे. दरम्यान, अभिनेता आशीष कुमारने या अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

The Ba***ds of Bollywood मधील हा सीन आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणासंबंधित असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. या दृश्यांवर आक्षेप घेत समीर वानखेडेंनी थेट कोर्टात धाव घेतली आहे. समीर यांनी त्यांच्या याचिकेत असा आरोप केला आहे की, सीरिजमधील एका विशिष्ट दृश्यातून त्यांची खिल्ली उडवण्यात आली आहे.

The Ba***ds of Bollywood मधील या सीनचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. तसंच या सर्व गोष्टींचा उल्लेख समीर वानखेडे आणि त्यांनी आर्यनविरोधात केलेल्या कारवाईशी संबंधित असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी दिल्या होत्या, यावरून बरेच मीम्ससुद्धा व्हायरल झाले होते.

दरम्यान, २ ऑक्टोबर २०२१ रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने मुंबईहून निघणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझ पार्टीवर छापा टाकला होता. यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंटसह इतर काहींना ड्रग्ज घेतल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली होती. याप्रकरणी आर्यन खानला जवळपास २८ दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. नंतर २८ ऑक्टोबर २०२१ रोजी त्याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.

मे २०२२ मध्ये NCB ने सांगितलं की, आर्यनविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे नसल्याने त्याच्यावरील कोणताही आरोप सिद्ध झाला नाही. याप्रकरणी तेव्हा काही संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या. काही लोकांनी NCBचं कौतुक केलं होतं, तर अनेकांनी या प्रकरणी ‘टार्गेटिंग ऑफ स्टार किड्स’ म्हणून टीका केली होती.