सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकद्वारे आपले करिअर सुरू करणाऱ्या प्रसिद्ध युट्यूबरबरोबर नुकतीच फसवणुकीची घटना घडली आहे. याबद्दल अभिनेत्याने स्वत: खुलासा केला आहे. ही फसवणूक त्याच्या अगदी जवळच्या मित्रानेच केली असून हा विश्वासघात वेदनादायक असल्याची प्रतिक्रियाही अभिनेत्याने व्यक्त केली आहे.
‘बिग बॉस’ ओटीटीच्या तिसऱ्या सीझनमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अदनान शेखबरोबरही आर्थिक फसवणुकीची घटना घडली आहे. अदनानची त्याच्या मित्राकडूनच चार लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. इतकंच नाही, तर त्या व्यक्तीने अदनानच्या जिममधील महागडं उपकरणदेखील चोरलं आहे.
अदनानने हिंदुस्तान टाइम्सला सांगितलं, “फसवणूक करणारा व्यक्ती माझ्या आणि माझ्या भावाच्या ओळखीचा होता. आमचं एकमेकांबरोबर अतिशय चांगले संबंध होते. मी त्याच्या बहिणीच्या लग्नासाठीदेखील आर्थिक मदत केली होती.”
यापुढे अदनानने सांगितलं की, मुंबईत मी पहिल्यांदा जिमचा व्यवसाय सुरू केला, त्यावेळी एका ओळखीच्या व्यक्तीद्वारे जिमच्या सोशल मीडिया पेजचं काम करण्यासाठी मी त्याला नोकरी दिली. पण दीड वर्षातच त्या व्यक्तीने माझा विश्वासघात केला.”
यानंतर अदनान म्हणाला, “काही काळ मी व्यवसायतल्या हिशोबाकडे दुर्लक्ष केलं. पण शेवटी मला त्याला थेट विचारावं लागलं. यावर त्याने कारण दिलं की, त्याच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आहे. पण जेव्हा मी स्वत: खात्री करून पाहिली, तेव्हा कळलं की, ते खोटं होतं. शेवटी त्या व्यक्तीने कबूल केलं की, त्याने चार लाख रुपये चोरले आहेत.”
दरम्यान, अदनानबद्दल सांगायचं झालं तर, तो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि मॉडेल आहे. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये अदनान सहभागी झाला होता. याव्यतिरिक्त ‘ऐस ऑफ स्पेस २’या शोमध्येही अदनान दिसला होता. सोशल मीडियावर त्याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.
अदनानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्याने नुकतीच एक खुशखबर दिली. जुलै महिन्यात अदनान बाबा झाला असून याबद्दल त्याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर शेअर केली होती. लग्नानंतर नऊ महिन्यांतच अदनानने बाबा झाल्याची खुशखबर दिली.