Squid Game Season 3: कोरियन चित्रपट, वेब सीरिजचा जगभरात मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. त्यापैकी एक वेब सीरिज म्हणजे ‘स्क्विड गेम’. २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ‘स्क्विड गेम’ ही थ्रिलर वेब सीरिज चांगलीच गाजली. या सीरिजमधील थरारक खेळाने अक्षरशः सगळ्यांना वेड लावलं. तसंच कथानकाने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं. त्यामुळेच ‘स्क्विड गेम’च्या दुसऱ्या सीझनला जगभरातील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून तिसऱ्या सीझनची चर्चा सुरू झाली. अशातच आज ‘स्क्विड गेम’ सीरिजच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘स्क्विड गेम’च्या तिसऱ्या सीझनच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘नेटफ्लिक्स’ने ‘स्क्विड गेम’च्या तिसऱ्या सीझनची घोषणा केली आहे. २०२५ हे वर्ष ‘नेटफ्लिक्स’साठी खूप खास आहे. ‘स्क्विड गेम’च्या तिसऱ्या सीझनसह ‘स्ट्रेंजर थिंग्स’, ‘वेडनेसडे’, ‘बेनोइट ब्लँक’, ‘हॅप्पी गिलमोर’, ‘द विचर’, ‘लव्ह इज ब्लाइंड’, ‘कोबरा काई’, ‘एमिली इन पॅरिस’, ‘एलिस इन बॉर्डरलँड’ यांसारख्या वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. यामधील ‘स्क्विड गेम’च्या तिसऱ्या सीझनच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

‘स्क्विड गेम’चा तिसरा सीझन २७ जून २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या सीरिजचं ‘नेटफ्लिक्स’वर स्ट्रिमिंग होणार असून हा ‘स्क्विड गेम’चा शेवटचा सीझन असणार आहे. ‘स्क्विड गेमचा’ दुसरा सीझन २६ डिसेंबर २०२४ला प्रदर्शित झाला होता. या सीरिजचं स्ट्रीमिंग नेटफ्लिक्सवर मध्यरात्री ३ वाजल्यापासून झालं होतं.

‘स्क्विड गेम’च्या तिसऱ्या सीझनमध्ये काय पाहायला मिळणार?

दुसऱ्या सीझनमध्ये सेओंग गि-हून थरारक खेळ कायमचा संपवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला. यावेळी स्वतः फ्रंट मॅन (गोंग यू) खेळात उतरला. त्यामुळे सेओंग गि-हूनचा हा खेळ संपवण्याचा प्रयत्न फ्रंट मॅन सतत हाणून पाडताना दिसला. अखेर सेओंग गि-हूनला फ्रंट मॅनने ताब्यात घेतल्यामुळे आता पुढे काय होतंय? हा थरारक खेळ संपुष्टात आणण्याचा गि-हूनच्या प्रयत्नाला यश मिळत की नाही? हे ‘स्क्विड गेम’च्या तिसऱ्या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, ‘स्क्विड गेम’ वेब सीरिजचा पहिला सीझन आणण्यासाठी १२ वर्षे लागली होती. पण ही सीरिज नेटफ्लिक्सची आतापर्यंतची सर्वात लोकप्रिय मालिका बनण्यासाठी फक्त १२ दिवस लागले होते. प्रदर्शित होताच अनेक देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर ‘स्क्विड गेम’ सीरिज ट्रेंड करत होती. त्यानंतर तीन वर्षांनी स्क्विड गेमचा दुसरा सीझनने धुमाकूळ घातला. आता ‘स्क्विड गेम’च्या तिसऱ्या सीझनसाठी चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netflix announces squid game 3 release date heres when and where to watch pps