Upcoming OTT Releases : या आठवड्यात ओटीटी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. थ्रिलर्स, क्राइम, ड्रामा, कॉमेडी आणि सस्पेन्स अशा विविध जॉनरच्या कलालकृती या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणाऱ्या सिनेमांमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा नातू ऐश्वर्य ठाकरेचा ‘निशांची’ सिनेमाही आहे. तसंच ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकरांचा गाजलेला ‘दशावतार’ सिनेमाही रिलीज होणार आहे. याशिवाय कोणते सिनेम आणि रिलीज प्रेक्षकांना पाहता येतील, चला जाणून घेऊ…
निशांची : निशांची’ हा अनुराग कश्यप दिग्दर्शित क्राइम ड्रामा आहे. या चित्रपटात नवोदित अभिनेता आणि बाळासाहेब ठाकरेंचा नातू ऐश्वर्य ठाकरे मुख्य भूमिकेत आहे. तसंच वेदिका पिंटो, मोनिका पवार, कुमुद मिश्रा, मोहम्मद झीशान अय्युब आणि विनीत कुमार सिंह यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यात अपयशी ठरला असला तरी समीक्षकांची प्रशंसा मिळाली आहे. १४ नोव्हेंबर रोजी ‘प्राइम व्हिडीओ’वर हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
इन्स्पेक्शन बंगलो : ‘इन्स्पेक्शन बंगलो’ ही मूळ मल्याळम भाषेत तयार केलेली एक हॉरर-कॉमेडी वेब सीरिज आहे. सैजू एसएस दिग्दर्शित या वेब सीरिजमध्ये शबरेश वर्मा, शाजू श्रीधर, जयन चेरथला, वीणा नायर, बालाजी सरमा, सेंथिल कृष्णा राजमणी आणि श्रीजीत रवी यांच्या भूमिका आहेत. ही हॉरर-कॉमेडी वेब सीरिज १४ नोव्हेंबर २०२५ पासून झी-५ वर रिलीज होणार आहे.
जॉली एलएलबी ३ : ‘जॉली एलएलबी ३’मध्ये कोर्टरूममधील कॉमेडी ड्रामा पाहायला मिळेल. यामध्ये वकील जगदीश ‘जॉली’ त्यागी (अरशद वारसी) आणि जगदीश्वर ‘जॉली’ मिश्रा (अक्षय कुमार) हे मुख्य भूमिकांत आहेत. या चित्रपटात एका शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या जमीन घोटाळ्यासंबंधित विषय मांडण्यात आला आहे. ‘जॉली एलएलबी ३’मध्ये अमृता राव, हुमा कुरैशी, सीमा बिस्वास, गजराज राव आणि राम कपूर हे कलाकारही आहेत. १४ नोव्हेंबर २०२५ पासून नेटफ्लिक्स आणि जिओ हॉटस्टारवर हा सिनेमा रिलीज होणार आहे.
दशावतार : ‘दशावतार’ हा एक मराठी सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. यात दिलीप प्रभावळकर हे बाबुली मेस्त्रीची मध्यवर्ती भूमिका साकारत आहेत. कोकणातील पारंपरिक दशावतार कलाप्रकार आणि पर्यावरणाला हानिकारक असलेल्या योजनेसंदर्भात भाष्य करण्यात आलं आहे. ‘दशावतार’मध्ये पर्यावरणाला हानिकारक असलेल्या योजनेला विरोध करण्यात माधवचा बळी जातो. मग बाबुली मेस्त्री आणि माधवची मैत्रीण वंदना, त्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दशावतार नाटकाच्या पौराणिक कथेचा वापर करून गुन्हेगारांना धडा शिकवतात. हा सिनेमा येत्या १४ नोव्हेंबर २०२५ पासून झी-५ वर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
