Pranit More Tak About Racism Criticism : ‘बिग बॉस १९’मध्ये टीव्ही आणि सिनेमातील कलाकारांसह सोशल मीडियावरील काही इन्फ्लूएन्सर्सही सहभागी झाले आहेत. त्यापैकीच सर्वांचा आवडता स्पर्धक म्हणजे कॉमेडियन प्रणित मोरे. प्रणित मोरे स्टँडअप कॉमेडियन आहे. त्याच्या विनोदाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कॉमेडियन बनण्याआधी प्रणितने आर.जे. म्हणूनही काम केलं आहे. त्याचा हा कॉमेडियन बनण्यापर्यंतचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता.
लहानपणी अनेक अपमान, टीका अन् ट्रोलिंग सहन करीत प्रणितनं स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. अशातच त्याला लहानपणी रंगभेदाचा सामना करावा लागला असल्याचं त्यानं म्हटलं आहे. सावळ्या रंगामुळे लहानपणी त्याला चिडवलं जायचं आणि त्यामुळेच त्याच्यात आत्मविश्वासही नव्हता. त्याबद्दल स्वत: प्रणित पहिल्यांदाच व्यक्त झाला आहे. ‘बिग बॉस’च्या सोमवारच्या भागात अशनूर कौरशी बोलताना त्यानं रंगभेदाच्या टीकेबद्दल मोकळेपणानं सांगितलं.
अशनूरबरोबरच्या संवादात प्रणित म्हणाला, “मी लहान होतो तेव्हा मला लोक तू काळा आहेस म्हणून चिडवायचे. तेव्हा मला खूप वाईट वाटायचं. पण, तेव्हा या गोष्टी तर माझ्या हातातही नव्हत्या; तरी मला का बोललं जातंय. माझ्या रंगावरून लोक मला का बोलत आहेत हे तेव्हा कळत नव्हतं, त्यामुळेच शोमध्येही मी कधीच कोणाला बॉडी शेमिंग किंवा चुकीचं काही बोलत नाही. मला माहितीये की, या अशा गोष्टींमुळे किती दु:ख होतं. सततच्या चिडवण्यामुळे शाळा आणि कॉलेजमध्ये असताना माझ्यात अजिबात कॉन्फिडन्स नव्हता. मला इंग्लिशही बोलता येत नव्हतं, त्यामुळे लोक इंग्लिश बोलता येत नाही, तर तुला काहीच येत नाहीये, असंच मानायचे.”
त्यानंतर तो म्हणाला, “माझ्या दिसण्यावरून तर मला सतत बोललं जायचं. जर मी कॉमेडी केली नसती, माझ्याकडे ह्युमर नसतं, तर मी काय केलं असतं? जेव्हा मला हे कळलं की, जर मी यांना काहीच बोललो नाही, तर हे शांत बसणार नाहीत; त्यामुळे ते मला बोलायच्या आधीच मी त्यांना असं काहीतरी बोलायचो, ज्यामुळे त्यांना वाईट वाटेल. पण, नंतर मला कळलं की, मी पण त्यांच्यासारखंच वागलो तर मग मी वेगळं काय करतोय, त्यांच्यात आणि माझ्यात मग काय फरक आहे.”
प्रणित मोरे इन्स्टाग्राम पोस्ट
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात प्रणित मोरेचा स्वभाव सर्वांनाच आवडत आहे. त्याचा खेळ, टास्क खेळण्याची पद्धत अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. सोशल मीडियावर त्याला अनेक मराठी प्रेक्षकांकडून पाठिंबा मिळताना दिसत आहे. प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या पाठिंब्याने प्रणित शेवटपर्यंत मजल मारेल, असा अंदाज आहे. मात्र, आता शोमध्ये पुढे काय काय होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. येत्या डिसेंबर महिन्यात ‘बिग बॉस १९’चा महाअंतिम सोहळा पार पडणार असल्याचं म्हटलं जात आहे.
