This Week OTT Releases : मराठीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत गेल्या काही दिवसांत अनेक दर्जेदार चित्रपट प्रदर्शित झाल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर आता काही चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहेत, म्हणून आम्ही तुम्हाला या आठवड्यात ओटीटीवर पाहता येणाऱ्या काही प्रादेशिक चित्रपटांची नावं सांगणार आहोत.
‘स्थळ’ – ‘स्थळ’ हा मराठी चित्रपट जो सविता या ग्रामीण महाराष्ट्रातील कापूस शेतकरी कुटुंबातील समाजशास्त्राच्या विद्यार्थिनीच्या आयुष्याशी संबंधीत आहे. चित्रपटात महिलांना लग्न करताना रंग, उंची यावरुन मिळणाऱ्या अपमानास्पद वागणूकीबद्दल सांगण्यात आलं आहे. दिग्दर्शक जयंत सोमलकर यांनी एक सामाजिक विषय मांडला आहे. हा चित्रपट १० ऑक्टोबरपासून ‘झी ५’वर पाहता येईल.
‘मिराई’ – ‘मिराई’ हा एक अॅक्शन चित्रपट असून या चित्रपटाची कथा भावूक करणारी आहे. यामध्ये अभिनेता तेजा सज्जा, रितिका नायक, श्रिया सरण, राणा डग्गुबत्ती हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळतात. अभिनेता प्रभासने यांचं निवेदन केलं आहे. हा चित्रपट १० ऑक्टोबरपासून ‘जिओ हॉटस्टार’वर पाहता येणार आहे. हा चित्रपट तेलुगू, तामिळ, मल्याळी आणि कन्नड भाषांमध्ये पाहता येईल.
Gandhi Kannadi हा एक तामिळ चित्रपट आहे. याची कथा एक पत्रकार आणि एका वकिला निगडीत आहे. उत्तम अभिनय आणि उत्कृष्ट पटकथेमुळे हा चित्रपट लक्ष वेधून घेतो. आधुनिक भारतात लोक ज्या मुल्यांबद्दल बोलतात ती खरंच पाळली जातात का, याबद्दल चित्रपटात सांगण्यात आलं आहे. हा चित्रपट १० ऑक्टोबरपासून ‘प्राईम व्हिडीओ’वर पाहता येईल.
Oru Vadakkan Pranaya Parvam- हा एक मल्याळी चित्रपट आहे, यामध्ये रोजच्या जगण्याबद्दल आणि नात्याबद्दल सांगण्यात आलं आहे. कलाकारांचा सशक्त अभिनय, सिनेमाची दर्जेदार मांडणी आणि भावस्पर्शी पार्श्वसंगीत यामुळे हा चित्रपट खास ठरतो. जे लोक वास्तवदर्शी सिनेमा पाहणं पसंत करतात, त्यांच्यासाठी हा एक उत्तम चित्रपट आहे. ३ ऑक्टोबरपासून हा चित्रपट ‘मनोरमा मॅक्स’वर प्रदर्शित झाला आहे.
‘रॅम्बो’ हा थरारक तामिळ चित्रपट, जो मानसिक संघर्षाबद्दल जागरुक करतो. या चित्रपटाची कथा वास्तववादी आणि शेवटपर्यंत उत्कंठा टिकवून ठेवणारी आहे. तसंच या सिनेमात अॅक्शनही पाहायला मिळतं. १० ऑक्टोबरपासून ‘सन एनएक्सटी’वर हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येईल.