द लॉर्ड ऑफ द रिंग्ज: द रिंग्ज ऑफ पॉवर सीझन २ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या ॲक्शन-ॲडव्हेंचर सीरिजमध्ये अरोंदिरची भूमिका साकारणाऱ्या इस्माइल क्रूझ कॉर्डोव्हाने बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचे कौतुक केले आहे. इस्माइलने ‘द ब्लफ’ मधील त्याची सह-कलाकार प्रियांका चोप्राचे कौतुक का केले, ते जाणून घेऊयात.

इस्माईलने प्रियंका चोप्रा, मिशेल योहचे केले कौतुक

क्विंट नियॉनला दिलेल्या मुलाखतीत ‘द रिंग्ज ऑफ पॉवर’ फेम अभिनेत्याला एक प्रश्न विचारण्यात आला. ऑर्क्सच्या सैन्याविरुद्धच्या लढाईत तू तुझ्याकडून लढायला कोणते दोन लोक निवडशील असा प्रश्न विचाल्यावर इस्माईल म्हणाला, “मी नुकतंच प्रियांका चोप्राबरोबर काम केलं. त्यामुळे आता मला तिचं नाव डोक्यात येतंय, त्यामुळे दोनपैकी ती एक असेल. यातच दुसरं नाव म्हणजे मिशेल योह. मला वाटतं मिशेल योह काहीतरी नक्कीच करेन आणि आम्हा सर्वांना सुरक्षित ठेवेल.”

२१ वर्षांचा संसार मोडला, सेलिब्रिटी जोडप्याने केली घटस्फोटाची घोषणा; कारण सांगत म्हणाले, “आम्ही दोघे…”

इस्माईल क्रूझ कॉर्डोव्हा आणि प्रियांका चोप्राने एकत्र केलंय काम

इस्माईलने प्रियांका चोप्रासह ‘द ब्लफ’ या ॲक्शन ड्रामा चित्रपटात काम केलं आहे. हा चित्रपट फ्रँक ई फ्लॉवर्सने दिग्दर्शित केला आहे. १९व्या शतकातील कॅरिबियनवर आधारित या चित्रपटाची प्रियांका चोप्रा, रुसो ब्रदर्स (जो रुसो, अँथनी रुसो) आणि इतरांनी सह-निर्मिती केली आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल, याच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

द लॉर्ड ऑफ द रिंग्ज: द रिंग्ज ऑफ पॉवर २ २९ ऑगस्ट रोजी रिलीज झाला. दुसरा सीझन तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.