Pankaj Tripathi Buys Two Apartments in Mumbai : बॉलीवूड अभिनेते पंकज त्रिपाठी हे त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांनी ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘स्त्री’ आणि ‘लुडो’ सारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पंकज त्रिपाठी जेव्हा जेव्हा एखाद्या चित्रपटाची घोषणा करतात, तेव्हा त्यांचे चाहते आनंदित होतात. पंकज त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कमी बोलणे पसंत करतात.
पंकज त्रिपाठी आणि त्यांची मुलगी आशी त्रिपाठी यांनी मिळून अंधेरी पश्चिम भागात एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. या अपार्टमेंटची किंमत तुम्हाला आश्चर्यचकित करेल. पंकज त्रिपाठी एका आलिशान घरात राहतात आणि आता त्यांनी आणखी दोन मालमत्ता खरेदी केल्या आहेत. त्यांनी खरेदी केलेले दोन अपार्टमेंट कोट्यवधींचे आहेत. त्यांच्या अपार्टमेंटची सर्वत्र चर्चा होत आहे.
अपार्टमेंटची किंमत किती आहे?
टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, पंकज त्रिपाठी यांच्या या दोन्ही मालमत्तेची एकत्रित किंमत १०.८५ कोटी आहे. पंकज यांनी अंधेरी पश्चिमेमध्ये एक फ्लॅट खरेदी केला आहे, ज्याची किंमत ९.९८ कोटी आहे. या घराचा RERA कार्पेट एरिया अंदाजे २,०२६ चौरस फूट आहे आणि बाल्कनी क्षेत्रफळ ३२.१४ चौरस मीटर आहे. या करारात तीन कार पार्किंग स्पेसचादेखील समावेश आहे. हा व्यवहार जुलै २०२५ मध्ये नोंदणीकृत झाला. यासाठी त्रिपाठी कुटुंबाने ५९.८९ लाख इतके मुद्रांक शुल्क आणि ३०,००० नोंदणी शुल्क भरले.
याशिवाय, पंकज त्रिपाठी यांची पत्नी मृदुला त्रिपाठी आणि मुलगी आशी त्रिपाठी यांनी कांदिवली पश्चिम येथेही एक अपार्टमेंट खरेदी केले आहे. या मालमत्तेची किंमत ८७ लाख रुपये आहे. याचा रेरा कार्पेट एरिया ३९.४८ चौरस मीटर म्हणजे सुमारे ४२५ चौरस फूट आहे. हा व्यवहार सप्टेंबर २०२५ मध्ये नोंदणीकृत झाला असून, यासाठी ४.३५ लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि ३०,००० रुपये नोंदणी शुल्क भरण्यात आले. पंकज त्रिपाठी हे सध्या मुंबईच्या मढ बेटावरील समुद्रकिनाऱ्याजवळील घरी राहतात. ‘रूप कथा’ असं त्यांच्या घराचं नाव आहे.
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर पंकज त्रिपाठी लवकरच ‘मिर्झापूर ४’ मध्ये दिसणार आहेत. चाहते ‘मिर्झापूर ४’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. याशिवाय पंकज त्रिपाठी यांचे इतर अनेक चित्रपट येणार आहेत. चाहते त्यांच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहात आहेत. ते शेवटचे अनुराग बसूच्या ‘मेट्रो इन दिनों’मध्ये दिसले होते, ज्याला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला होता.