अभिनेत्री प्रिती झिंटा विनयभंग प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी शनिवारी रात्री गरवारे पॅव्हेलियन मध्ये हजर असलेल्या दोघांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. प्रितीचा माजी प्रियकर आणि याप्रकरणातला आरोपी नेस वाडिया परदेशात असल्याने त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. राज्य महिला आयोगाने २४ तासात आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे.
अभिनेत्री प्रिती झिंटा आणि आयपीएल मधील किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाची मालकिण असलेल्या प्रिती झिंटाने (३९) मंगळवारी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात माजी प्रियकर नेस वाडिया (४४)  याने शिविगाळ करून विनयभंग केल्याची तक्रार केली होती. ३० मे रोजी वानेखेडे स्टेडियममध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान सामना सुरू असताना नेसने गरवारे पॅव्हेलियनच्या व्हीव्हीआयपी कक्षात येऊन आपला विनयभंग केल्याचे तक्रारीत तिने नमूद केले. त्यानुसार नेस वाडियावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना घटनेच्या दिवसाचे सीसीटीव्ही चित्रण तपासले आहे. तसेच शनिवारी रात्री या ठिकाणी उपस्थित असणसाऱ्या दोघांचे जबाबही नोंदवून घेतले आहेत. सध्या प्रिती झिंटा आणि नेस वाडिया दोघेही परदेशात आहेत. प्रितीने वाडियाला समज देणारा इमेलही पाठविल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस या इमेलची तपासणी करत आहेत.  दरम्यान, राज्य महिला आयोगाने आरोपी नेस वाडिया याला २४ तासात अटक करा, अशा मागणीचे पत्र मरीन ड्राईव्ह पोलिसांना दिले. यावेळी प्रितीकडून काही प्रश्नांचा खुलासा करून घ्यावयाचा आहे. ती परदेशात असल्याने तिच्याशी संपर्क होऊ शकत नाही. परंतु लवकरच तपास करुन कारवाई केली जाईल असे आश्वासन मरीन ड्राईव्ह पोलिसांनी महिला आयोगाला दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preity zinta molestation case police record statement of two persons