अभिनेता राजकुमार राव याने आजवर आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. वेगवेगळ्या भूमिका साकारत राजकुमार रावने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केलीय. ‘रुही’ या सिनेमातून तो प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा सज्ज झालाय.
मात्र 10 मार्चला राजकुमारने त्याच्या बालपणीचा एक फोटो शेअर करत भावूक पोस्ट लिहली आहे. आईच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्ताने राजकुमारने आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे. राजकुमारच्या या पोस्टने चाहते देखील भावूक झाले. राजकुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आईसोबतचा एक जुना फोटो शेअर केलाय. या फोटोत चिमुकला राजकुमार त्याच्या आईला बिलगुल बसल्याचं दिसतंय. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
हा फोटो शेअर करत राजकुमारने आईने दिलेल्या शिकवणीबद्दल सांगितलं आहे. ” तू आम्हाला सोडून गेलीस त्याला 5 वर्ष झाली. परंतु, आजपर्यंत असा एक दिवसही आला नाही कि मला तूझं अस्तित्व जाणवलं नाही. तुझ्या आशीर्वादाशिवाय या जगात माझ्यासाठी काहीच शक्य झालं नसतं आणि मला माहितेय की तुझे आशीर्वाद आजही माझ्यासोबत आहेत. आई सगळ्यात बेस्ट असते. या जगात आईपेक्षा मौल्यवान काहीच नाही. मी प्रत्येक आईमध्ये तुलाचं पाहतो.” असं कॅप्शन देत राजकुमारने आईवरील प्रेम व्यक्त केलंय. पुढे त्याने लिहलंय, “मुझे पता है आप जहां भी हैं ख़ुश हैं और पापा और आप मिलकर खूब बातें करते होंगे और अपना आशीर्वाद हमें देते रहते होंगे.. तुला अभिमान वाटेल असंच मी नेहमी वागेन आई. ” असं त्यानं म्हंटलं आहे.
तर हा फोटो शेअर करताना राजकुमारने आईने शिकवलेल्या दोन गोष्टींबद्दल सांगितलं आहे. ‘दया आणि कोणत्याही कठिण परिस्थितीत विश्वास कायम ठेवणं’ हे दोन धडे कायम स्मरणात राहतील असं म्हणत ‘मला तुझा मुलगा असल्याचा सार्थ अभिमान आहे.’ असं तो म्हणाला आहे.
राजकुमार रावच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रियांका चोप्रा, भूमी पेडणेकर, आयुष्यमान खुराना, विकी कौशल अशा बऱ्याच सेलिब्रिटींना हार्टचं इमोजी देत राजकुमार आणि त्याच्या आई बद्दल प्रेम व्यक्त केलंय. तर अनेकांनी ‘तुझी आई किती सुंदर आहे. आम्हाला दु:ख आहे ‘ अशी प्रतिक्रिया दिलीय.
करिअरच्या सुरुवातील राजकुमार रावला बॉलिवूडमध्ये पाय रोवण्यासाठी काही अडचणींचा सामना करावा लागला होता. मात्र त्याने आईच्या शिवकणीप्रमाणे कायम स्वत: ठेवून पुढे जाणं पसंत केलं. राजकुमार सध्या त्याच्या आगामी ‘बधाई दो’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात भूमी पेडणेकरसोबत तो झळकरणार आहे.