दाक्षिणात्य चित्रपटांनी आपल्या प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. सध्या बॉलिवूड किंवा हिंदी चित्रपटापेक्षा दाक्षिणात्य चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असतात. ‘पुष्पा’, ‘केजीएफ’पासून ‘कांतारा’, ‘आरआरआर’पर्यंत बऱ्याच साऊथच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता तेलुगू चित्रपटसृष्टीच्या आणखी एका सुपरस्टारचा पहिला पॅन-इंडिया चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तेलुगू सुपरस्टार रवी तेजाचा आगामी ‘टायगर नागेश्वर राव’ या चित्रपट लवकरच देशभरात वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला असून लोकांनी त्याल जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. ‘द काश्मिर फाइल्स’चे निर्माते अभिषेक अग्रवाल यांनीच या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

आणखी वाचा : मनोज बाजपेयींनी केले अमृता सुभाषचे तोंडभरून कौतुक; उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देत म्हणाले, “तिची जिद्द…”

या जबरदस्त अॅक्शन ड्रामामध्ये गायत्री भारद्वाज आणि नूपुर सनॉन प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. या फर्स्ट लूकमध्ये रवी तेजाचा धडकी भरेल असा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे, शिवाय यात एकाहून एक जबरदस्त डायलॉगही आपल्याला ऐकायला मिळणार आहे. हा एक जबरदस्त अॅक्शन ड्रामा चित्रपट असेल असं याच्या फर्स्टलूकवरुन म्हंटलं जात आहे.

वामसी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले असून हा चित्रपट ७० च्या दशकातील कुख्यात चोर नागेश्वर रावच्या जीवनावर बेतलेला असणार आहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या चित्रपटासाठी जॉन अब्राहमने व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे. आपल्याला या फर्स्ट लूकमध्ये जॉनच्या आवाजातूनच नागेश्वर रावची ओळख करून देण्यात येते. ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनीदेखील हा टीझर शेअर केला आहे. हा चित्रपट ५ भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.