Richa Chadha Slams Trollers on Natural Birth Comment : बॉलीवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा आई झाल्यापासून तिचा मातृत्वाचा प्रवास खूप एन्जॉय करत आहे. १६ जुलै रोजी जेव्हा तिची लहान मुलगी जुनैरा एक वर्षाची झाली, तेव्हा तिने एक भावनिक रील शेअर केली.

या रीलमध्ये तिच्या गरोदरपणापासून ते मातृत्वापर्यंतचे सुंदर क्षण होते. तिची नैसर्गिक प्रसूती झाली होती, असं तिनं सांगितलं आणि त्यानंतर तिला ट्रोल करण्यात आलं. रिचा चढ्ढा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा ती तिचे सुंदर क्षण चाहत्यांबरोबर शेअर करते.

रिचा चढ्ढाची पोस्ट

आई होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यावर तिनं तिच्या मुलीच्या एका वर्षाच्या आठवणींसह एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले- “आमच्या आयुष्यात आमच्या मुलीनं आनंदाचे रंग भरले आहेत. एक वर्षापूर्वी मी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये एका निरोगी मुलीला जन्म दिला. डिलिव्हरीला फक्त २० मिनिटं लागली. नैसर्गिक प्रसूती झाली. तेव्हापासून आयुष्य पूर्वीसारखं राहिलेलं नाही. विशेषतः माझ्यासाठी मी आतून- बाहेरून बदलली आहे. माझं मन, माझं हृदय, माझं शरीर, माझा आत्मा. जुनैराचा जन्म एक वर्षापूर्वी झाला होता आणि माझाही. मी आई म्हणून पुनर्जन्म घेतला. मी पूर्वीपेक्षा वेगळी पूर्णपणे नवीन अस्तित्वात आहे.”

तिने पुढे लिहिले, ‘माझ्या स्वप्नातील पुरुषाबरोबर एक जीवन आणि एक मूल… जर हा आशीर्वाद नसेल, तर मला माहीत नाही हे काय आहे’. काही लोकांना तिची पोस्ट खूप आवडली, तर काहींना ती अजिबात आवडली नाही.

ट्रोलर्सना रिचाने नैसर्गिक प्रसूती म्हटले ते आवडले नाही. एका वापरकर्त्याने लिहिले, “प्रत्येक जन्म नैसर्गिक असतो, आजकाल प्रसूती विज्ञानाच्या मदतीने केली जाते.” रिचाने लगेचच उत्तर दिले, “मी नॉर्मल डिलिव्हरी बोलले असते तरी तुम्ही काहीतरी बोलला असता.”

जेव्हा एका वापरकर्त्याने व्हजायनल डिलिव्हरी, अशी कमेंट केल्यानंतर मात्र रिचा भडकली. ती म्हणाली, “जर मला व्हजायनल डिलिव्हरी म्हणायचं नसेल, तर काय होईल? ही माझी पोस्ट आहे, माझं शरीर आहे, माझी योनी आहे आणि माझं बाळ आहे. फेमिनिझमनं मला शिकवलं आहे की, माझे शब्द मी स्वतः निवडू शकते.” रिचाने नंतर संपूर्ण कमेंट सेक्शन डिलीट केले असले तरी तिने स्पष्ट केले की, तिला तिच्या शब्दांबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही.

‘नैसर्गिक प्रसूती’ या शब्दावरून एखाद्या सेलिब्रिटीला वादाला तोंड द्यावे लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही आठवड्यांपूर्वी सुनील शेट्टीने त्याची मुलगी अथिया शेट्टी हिच्या सी-सेक्शनशिवाय बाळंतपणाच्या निर्णयाचे कौतुक केल्यानंतर त्याला टीकेला सामोरे जावे लागले होते.