‘हाऊसफुल्ल’ आणि ‘ग्रॅण्ड मस्ती’सारख्या चित्रपटांसाठी ओळखला जाणारा अभिनेता रितेश देशमुखला विनोदी चित्रपट करून कंटाळा आला आहे. रितेश हा त्याच्या कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जातो, विनोदी भूमिकांसाठी त्याने अनेक पुरस्कार मिळवले आहेत. या विषयी बोलताना रितेश म्हणतो, मला विनोदी चित्रपट करून कंटाळा आला आहे, शिवाय नवीन काय करावे ते मला उमगत नाहीये. मला कळत नाहीये की मी असं काय करू, जे मी आत्तापर्यंत केलेल्या कामापेक्षा वेगळे असेल. साजिद खानच्या ‘हमशकल्स’ या आगामी चित्रपटात दिसणाऱ्या रितेशने या आधी ‘नाच’ आणि ‘रन’सारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट करण्याचा प्रयत्न केला. परंतु, चाहते त्याला विनोदी भूमिकेत पसंत करत असल्याने त्याचे हे चित्रपट चालले नाहीत.
‘हमशकल्स’ नंतर रितेश ‘एक व्हिलन’ चित्रपटात एका अनोख्या भूमिकेत दिसणार असून, यात सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूर हे त्याचे सहकलाकार आहेत. चित्रपटाच्या प्रोमोमधील त्याच्या लूकला चाहत्यांकडून मिळत असलेल्या प्रतिक्रिया पाहून तो जाम खूश आहे. याबाबत बोलताना तो म्हणतो, या चित्रपटासाठी मला सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. चित्रपटातील माझ्या भूमिकेबाबत लोकांमध्ये उत्सुकता असून, माझ्या भूमिकेविषयी ते चर्चा करत आहेत. भविष्यात मी कोणत्याप्रकारचे चित्रपट करेन ते ‘एक व्हिलन’ हा चित्रपट कशी कामगिरी करतो, यावर अबलंबून असणार आहे. मी वेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारू शकेन, याची मला आशा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh i am bored of comedies ek villain will decide the kind of roles i will do in future