Rubina Dilaik on Himachal floods : गेल्या काही दिवसांत पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश व हिमाचल प्रदेशात झालेला मुसळधार पाऊस आणि त्यामुळे आलेल्या पुराने तेथील परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक हिमाचल प्रदेशची आहे. तिथेच ती लहानाची मोठी झाली आहे. सध्या पंजाब, हिमाचल प्रदेशमधील पूरस्थिती पाहता, रुबिनाने सोशल मीडियावरून दु:ख व्यक्त केलं आहे.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैकने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आणि तिच्या मनातील भावना लोकांपर्यंत पोहोचवल्या. रुबिनाने व्हिडीओमध्ये सांगितले की, लोक तिला सतत विचारत आहेत की, हिमाचलमधील परिस्थितीवर ती गप्प का आहे? त्यावर तिने सांगितलेय की, पाऊस आणि भूस्खलनामुळे तिथे मोठं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत आणि विजेची स्थितीही खूप वाईट आहे.

ती पुढे म्हणाली, “चार दिवसांपासून माझंच कुटुंब हिमाचलमधील आमच्या फार्म हाऊसवर आहे. माझे आई-वडील, माझ्या दोन्ही मुली आणि आजी एवढेच तिथे राहत आहेत. तीन दिवसांपासून फार्म हाऊसवर वीज नाहीये. नेटवर्क नाहीये. सगळे सुरक्षित आहेत; पण ज्या परिस्थितीतून ते सगळे जात आहेत. त्यावर आपण फक्त प्रार्थनाच करू शकतो. मला इथे बसल्या बसल्या सतत चिंता लागलेली असते.”

रुबिना म्हणाली,”दोन आठवड्यांपासून मी आणि अभिनव आमची फ्लाईट रिशेड्युलवर रिशेड्युल करीत आहोत; पण आम्हाला संधीच मिळत नाहीये. १५ दिवसांपूर्वी जेव्हा मी गेले होते तेव्हा मी स्वत: तीन दिवस अडकले होते. हिमाचल, पंजाबमध्ये जी परिस्थिती आहे, त्यात अनेक लोक कठीण परिस्थितून जात आहेत हे मी समजू शकते. मी देवाकडे फक्त प्रार्थना करू शकते की, सगळ्यांना सुरक्षित ठेव. सोशल मीडियावरून जर फंड गोळा करायचे असतील, तर तेही मी करेन. मला हेच सांगायचं आहे की, मी आणि माझं कुटुंबही या परिस्थितीचा सामना करीत आहे. आपण या नैसर्गिक आपत्तीतून बाहेर पडू आणि सगळे सुरक्षित राहू दे. ज्यांचं नुकसान झालं आहे, त्या कुटुंबांबद्दल मला सहानुभूती आहे.” पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी सतत पुढे येत आहेत.