निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता नागराज मंजुळे यांची प्रस्तुती असलेला ‘नाळ’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आणि रसिकप्रेक्षकांनी चित्रपटगृहांमध्ये एकच गर्दी करत यावर आपल्या पसंतीची ठसठशीत मोहोर उमटवली. या चित्रपटातील ‘आई मला खेळायला जायचंय’ हे गाणं चांगलंच प्रसिद्ध झालं. या गाण्यातून आईकडे खेळायला जाण्यासाठी हट्ट करणाऱ्या एका निरागस मुलाची कथा पाहायला मिळते. हे गाणं गाणाऱ्याच्या आवाजानेही प्रेक्षकांना वेड लावलं. पण हे गाणं नेमकं कोणी गायलं आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? एका रिअॅलिटी शोच्या चिमुकल्या स्पर्धकाने हे गाणं गायलं आहे. हा स्पर्धक ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून चर्चेत आला होता.
२०१७ मध्ये जयस कुमार या चिमुरड्याने ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मध्ये सहभाग घेतला. पाच वर्षांच्या जयसने तेव्हा प्रेक्षक-परीक्षक सर्वांनाच त्याच्या गायनाने वेड लावलं होतं. अवघ्या पाचव्या वर्षी त्याचं गायनकौशल्य पाहून भारावलेल्या परीक्षकांनी त्याला ‘छोटे भगवान’ असं नाव दिलं. त्यानेच ‘नाळ’मधील ‘जाऊ दे न व’ हे गाणं गायलं आहे.
जयसच्या गायनासोबतच त्याच्या स्मरणशक्तीचीही परीक्षक दाद देतात. तो झटपट कोणत्याही गाण्याचे बोल पाठ करू शकतो. ‘नाळ’ या चित्रपटासोबतच त्याने गायन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या गाण्यातून लहान मुलाचं विश्व आणि त्याची निरागसता जयसच्या आवाजातून उत्तमप्रकारे टिपण्यात आलं आहे.
सुधाकर रेड्डी दिग्दर्शित ‘नाळ’ बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई करत आहे. मुंबई पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर आणि इतर शहरांमध्येही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
