बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी ७ जुलै २०२१ रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनाची बातमी ऐकून पत्नी सायरा बानो यांनी त्यांच्या जगण्याचं निमित्तंच हिरावून गेल्याचं म्हटलंय. दिलीप कुमार यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत पत्नी सायरा बानो त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहिल्या. त्यांच्यासाठी या दुःखातून बाहेर पडणं खूप अवघड आहे.
दिलीप कुमार यांच्या निधनाची सगळ्यात पहिली बातमी पल्मोनोलॉजिस्ट डॉ. जलील पारकर यांनी दिली. डॉ. जलील पारकर हे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्यावर उपचार करत होते. एका माध्यमाशी बोलताना डॉ. जलील पारकर यांनी सांगितलं की, ज्यावेळी सगळ्यात आधी पत्नी सायरा बानो यांना दिलीप कुमार यांच्या निधनाची बातमी सांगितली त्यावेळी त्या कोलमडून गेल्या. “देवाने माझ्या जगण्याचं निमित्तंच हिरावून घेतलंय….साहेबांशिवाय मी कसलाच विचार करू शकणार नाही…सगळ्यांनी कृपया प्रार्थना करा!”, अशा भावना पत्नी सायरा बानो यांनी व्यक्त केल्या.
दिलीप कुमार हे मंगळवारपासूनच मुंबईतल्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल होते. डॉ. जलील पारकर यांनी एका माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून असलेल्या आजारपणामुळे सकाळी साडे सात वाजता त्यांचं निधन झालं. त्यांचे जवळचे मित्र फैसल फारूकी यांनी सकाळी ८ वाजता ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली. यात त्यांनी लिहिलं, “जड मनाने आणि मोठ्या दुःखाने याची घोषणा करतोय की काही मिनिटांपूर्वी दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. आपण देवाकडून येतो आणि परत देवाकडेच परत जातो.”
दिलीप कुमार गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर पत्नी सायरा बानो यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. दिलीप कुमार आणि सायरा बानो यांना कोणतेही अपत्य नाही. दिलीप कुमार आणि सायरा बानो यांनी कायम एकमेकांना साथ देत प्रत्येक अडचणीचा त्यांनी सामना केलाय. त्यामूळेच त्यांना मुलाच्या सुखाची देखील कमी भासली नाही. संकटांवर मात करून आपले नाते दोघांनी मजबूत केले. त्यामूळे दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा बानो कोणत्या परिस्थितीतून जात आहेत, याची कल्पनाही करता येणार नाही.