ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते गोविंद नामदेव हे चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिकांसाठी ओळखले जातात. गोविंद यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. सध्या गोविंद यांचे नाव त्यांच्यापेक्षा ४० वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्री शिवांगी वर्माबरोबर चर्चेत आहे.
शिवांगी आणि गोविंद यांचा एक फोटो व्हायरल झाला होता, त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. शिवांगीने इन्स्टाग्रामवर अभिनेत्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले – “प्रेमाला वय नसते, मर्यादा नसते.”
अशा परिस्थितीत, अलीकडेच गोविंद यांनी या बातम्यांवरील आपले मौन सोडले आणि हा अभिनेत्रीचा प्रमोशनल स्टंट असल्याचे म्हटले. दरम्यान, आता शिवांगीने गोविंद यांच्या विधानावर प्रत्युत्तर दिले आहे.
गोविंद नामदेव यांच्या विधानाचा बदला घेण्यासाठी शिवांगी वर्माने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. बुधवारी (११ जून) संध्याकाळी शिवांगीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. शिवांगीने लिहिले, ‘कोणीतरी बरोबर म्हटले आहे, वाढत्या वयानुसार वृद्ध लोक वेड्यासारखे वागतात… ‘ शिवांगीच्या या पोस्टचा थेट अर्थ असा आहे की, वृद्ध लोक वयानुसार त्यांचा समजूतदारपणा गमावतात. सोशल मीडियावरील वापरकर्ते या पोस्टला गोविंद नामदेव यांच्याशी जोडत आहेत.
गोविंद शिवांगीबद्दल काय म्हणाले
अलीकडेच ७० वर्षीय गोविंद नामदेव यांनी ई टाइम्सला मुलाखत दिली. या दरम्यान त्यांनी सांगितले की, शिवांगी वर्माबरोबरचा त्यांचा व्हायरल झालेला फोटो हा त्यांच्या आगामी ‘गौरीशंकर गोहरगंज’ चित्रपटाच्या प्रमोशनल मोहिमेचा एक भाग होता. चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि शिवांगी वर्मा यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत चित्रपटाच्या प्रमोशनबाबत अनेक रणनीतींवर चर्चा झाली. नामदेव यांनी केवळ प्रमोशनसाठी या प्रमोशनल कल्पनेला मान्यता दिली होती. परंतु, त्यानंतर शिवांगीने त्यांना न सांगता सोशल मीडियावर हे प्रमोशन पुढे नेले आणि चित्रपटाला टॅग करत पोस्ट केली, ज्यामुळे गैरसमज निर्माण झाले. अफवा वाढल्यानंतर नामदेव यांनी संपूर्ण प्रकरणापासून स्वतःला दूर केले. अभिनेत्याने असेही म्हटले की, त्यांच्या लग्नात समस्या असल्याच्या सर्वत्र बातम्या येत आहेत, दोघेही वेगळे होत आहेत. गोविंद यांनी घटस्फोटाच्या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले. या बातम्यांमुळे केवळ प्रेक्षकच नाही तर त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीयांनाही वाईट वाटत असल्याचे अभिनेत्याने सांगितले.