सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘कुली’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर थिएटरमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. या चित्रपटाने दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर ११८.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

दरम्यान, श्रुती हासनबरोबर एक मजेदार घटना घडली आहे. ती या चित्रपटात प्रीतीची भूमिका साकारत आहे. श्रुतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘कुली’ चित्रपट प्रदर्शित झाला, त्या दिवशी म्हणजे १४ ऑगस्ट रोजी श्रुती हासन ‘कुली’चा पहिला शो पाहण्यासाठी चेन्नईच्या वेत्री थिएटरमध्ये पोहोचली होती. मजेदार गोष्ट म्हणजे चित्रपटगृहाच्या सुरक्षा रक्षकाने मुख्य गेटवर अभिनेत्रीची गाडी थांबवली. ते पाहून श्रुती हासन आणि तिच्या मैत्रिणी हसायला लागल्या. श्रुती सुरक्षा रक्षकाला मनोरंजक पद्धतीने विनंती करतानाही दिसली. ती त्याला म्हणते, “प्लीज, अण्णा! मी स्वतः या चित्रपटात आहे.”

श्रुती हासनचा हा २३ सेकंदांचा व्हिडीओ क्लिप खूप शेअर केला जात आहे. सोशल मीडियावर हे पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलत आहे. वेत्री थिएटर्सचे मालक राकेश गौतमन यांनीही हा व्हिडीओ एक्सवर री-पोस्‍ट केला आहे.

व्हिडीओमध्ये श्रुती आणि तिच्या मैत्रिणी गाडीत असल्याचे आपल्याला दिसते. ती वेत्री थिएटरच्या आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असताना, रायल नावाचा एक सुरक्षा रक्षक गेटवर तिची गाडी थांबवतो. त्यानंतर श्रुती हसताना ऐकू येते आणि म्हणते, “मी चित्रपटात आहे. कृपया मला आत येऊ द्या, अण्णा. मी हिरोईन आहे सर.” तर मागे बसलेल्या अभिनेत्रीच्या मैत्रिणी हसत आहेत. नंतर रायल गाडीला आत जाऊ देतो.

वेत्री थिएटरचे मालक राकेशने व्हिडीओ री-पोस्‍ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ‘माझा मित्र रायलने त्याचे कर्तव्य चांगले बजावले. खूप मजेदार क्षण. आमच्याबरोबर असल्याबद्दल धन्यवाद श्रुती हासन मॅडम… आशा आहे की, तुम्हाला हा शो आवडला असेल.”

सोशल मीडियावरील लोकांना हा व्हिडीओ मजेदार आणि गोंडसदेखील वाटत आहे. लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘कुली’मध्ये नागार्जुन आणि सौबिन शाहीर यांच्याशिवाय श्रुती हासन आणि रजनीकांत यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटात आमिर खान आणि उपेंद्र राव यांनीही कॅमिओ केले आहेत. रजनीकांत यांच्या कारकिर्दीतील हा १७१ वा चित्रपट आहे. त्याबरोबरच या सुपरस्टारने इंडस्ट्रीमध्ये ५० वर्षे पूर्ण केली आहेत.