चीनमधील करोना विषाणूचा फैलाव संपूर्ण जगभरात झाला आहे. त्यामुळे प्रत्येक देश प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करत आहे. यात भारतातही २१ दिवसांचा लॉकडाउन करण्यात आला आहे. तसंच काही दिवसापूर्वी विमान कंपन्यांनी त्यांची उड्डाणेही रद्द केली आहेत. त्यामुळे सध्या बॉलिवूडचा लोकप्रिय गायक सोनू निगम दुबईमध्ये अडकला आहे.  मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात आहे. यामध्ये त्याने लॉकडाउनमध्ये घरातून बाहेर पडणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. सोनूने एक व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

“हा व्हिडीओ मी खास तुमच्यासाठी करतोय. आपण एका नकारात्मक परिस्थितीवर मात करत त्याला सकारात्मक परिस्थितीमध्ये बदलायचा प्रयत्न करतोय. जे प्रेम, आशीर्वाद मला मिळाले, त्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचं लॉकडाउन करण्याचा एक उत्तम निर्णय घेतला आहे. कारण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. रविवारी जनता कर्फ्युच्या दिवशी रात्री ९ नंतर काही लोक रस्त्यावर येऊन गोंधळ करत होते.  या मुर्ख लोकांमुळे परिस्थिती बिघडते. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी घेतलेला कर्फ्युचा निर्णय अगदी योग्य आहे, असं सोनू म्हणाला.