मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री स्मिता तांबेच्या घरी लवकरच एक छोटा पाहुणा येणार आहे. नुकताच स्मिता तांबेच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम थाटामाटात पार पडला. आई बनणार असल्याचा आनंद स्मिता तांबेने तिच्या फॅन्ससोबत शेअर केलाय. तिच्या घरी पार पडलेल्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचा एक स्पेशल व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये तिच्या मैत्रिणींनी ‘गं कुणी तरी येणार येणार गं’ या गाण्यावर परफॉर्मन्स करत स्मिता तांबेच्या आयुष्यातला हा महत्वाचा क्षण आणखी स्पेशल बनवलाय.

अभिनेत्री स्मिता तांबेने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा स्पेशल व्हिडीओ शेअर केलाय. बाळाच्या आगमनाची स्मिता तांबे आणि तिचा पती विरेंद्र द्विवेदी हे दोघेही किती आतुरतेनं वाट पाहताहेत, याची प्रचितीही यावेळी आली. यावेळी स्मिता खूपच गोड दिसत होती. हिरव्या रंगाचा ड्रेस तिला खुलून दिसत होता. महत्त्वाचं म्हणजे ती आनंदी दिसत होती. तिचा हा आनंद आणखी द्विगुणीत करण्यासाठी तिच्या मैत्रीणींना या कार्यक्रमात स्मिताला स्पेशल सरप्राईज दिलं. अभिनेत्री फुलवा खामकर, रेशम टिपणीस, अदिती सारंगधर आणि अमृता सुभाष या चौघींनी एकत्र ‘गं कुणी तरी येणार येणार गं’ या गाण्यावर धम्माल डान्स केलाय. यावेळी स्मिता तांबे सुद्धा आपल्या चेहऱ्यावरील एक्स्पेशन्सने मैत्रिणींच्या परफॉर्मन्समध्ये सहभागी होताना दिसून आली. तसंच घरी बाळ येणार या आनंदाच्या भरात स्मिता तांबेचा पती विरेंद्र द्विवेदी सुद्धा थिरकताना दिसून आला. यावेळी प्रेग्नंसीमुळे स्मिताच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज झळकत होतं.

हे देखील वाचा: तब्बल १५ वर्षांनंतर अंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; ‘या’ भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

स्मिता तांबेनी तिच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातील धम्माल केलेल्याचा एका व्हिडीओ शेअर करून ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिच्या या व्हिडीओवर तिचे चाहते लाइक्स आणि कमेंट्स करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

अभिनेत्री स्मिता तांबे ही मुळची साताऱ्याची आहे. पुण्यात तिचं बालपण गेलंय. त्यानंतर अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी ती मुंबईत शिफ्ट झाली.‘अनुबंध’, ‘लाडाची लेक गं’ या मालिका, ‘तुकाराम’, ‘जोगवा’, ‘७२ मैल एक प्रवास’, ‘परतु’, ‘गणवेश’ यासारख्या अनेक चित्रपटात तिने आपल्या अभिनयाची जादू पसरवली. मराठी चित्रपटांसोबतच ‘सिंघम रिर्टन्स’, ‘रुख’, ‘नूर’, ‘डबल गेम’ या हिंदी चित्रपटांमध्ये तिने काम केलंय.

१८ जानेवारी २०१९ रोजी स्मिता तांबेने नाट्य कलाकार विरेंद्र द्विवेदी याच्यासोबत लग्न केलं. महाराष्ट्रीयन आणि साउथ इंडियन दोन्ही पद्धतीने विवाह विधी पार पाडत त्यांचा हा अनोखा विवाह पार पडला.