Sonali Kulkarni On Raj and Uddhav Thackeray Meeting : गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव हे दोघे ठाकरे बंधूं चांगलेच चर्चेत आहेत. गेल्या महिन्यात ५ जुलै रोजी मराठी भाषेबद्दलच्या विजयी मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरे तब्बल १९ वर्षांनी पहिल्यांदाच एकत्र आले.
विजयी मेळाव्याच्या भेटीनंतर राज-उद्धव यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. अशातच गणेशोत्सवाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे नुकतेच राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी गेले. गणरायाच्या दर्शनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे राज यांच्या घरी कुटुंबासह गेले. या क्षणांचे काही फोटो-व्हिडीओ सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये पाहायला मिळाले.
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर राजकीय क्षेत्रातील अनेक मंडळी त्यांची मतं व्यक्त करत आहेत. अशातच मनोरंजन क्षेत्रातूनही राज-उद्धव यांच्या भेटीबद्दल चर्चा होताना दिसत आहे. राज-उद्धव यांच्या भेटीवर आता मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिची प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई तकशी साधलेल्या संवादात सोनाली म्हणाली, “ते (ठाकरे बंधू) काही औपचारिक घोषणा करत नाहीत. तोपर्यंत सगळ्या अफवा आणि चर्चांवर किती विश्वास ठेवावा हे प्रश्नार्थी आहे. पण महाराष्ट्राची संस्कृती तसंच सामाजिक आणि राजकीय परिस्थितीसाठी हे चांगलं असेल तर ते नक्कीच व्हावं आणि कायमस्वरूपी व्हावं.”
यानंतर सोनालीने मराठी-हिंदी भाषेच्या मुद्द्यावरही आपलं मत व्यक्त केलं. याबद्दल सोनाली म्हणाली, “महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीसाठी हे उत्तम ठरेल असं वाटतंय. भाषेवरचा, प्रांतावरचा आणि जातिवाद… या सगळ्या गोष्टी होऊ नयेत. घडू नयेत. तरीही आपली भाषा, संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवण्यासाठीचे प्रयत्न आपण केले पाहिजेत असंही वाटतं.”
सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम पोस्ट
दरम्यान, सोनाली कुलकर्णीच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. सोनाली आणि तिचा भाऊ मिळून दरवर्षी घरीच गणपतीची सुंदर मूर्ती बनवतात. यंदाच्याही वर्षी सोनालीने स्वत:च्या हातांनी गणपती बाप्पाची मूर्ती साकारली. याचे खास क्षण तिने सोशल मीडियाद्वारे शेअर केल्याचे पाहायला मिळाले.