बॉलिवूड अभिनेता सोनू सूद करोना काळात गरिबांसाठी केलेल्या कामांबरोबरच त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी देखील चर्चेत आलाय. सोनू सूद आणि दिग्दर्शिका फराह खान यांनी एकत्र येत ‘साथ क्या निभाओगे’ या गाण्याची घोषणा केल्यापासूनच फॅन्स प्रतिक्षेत आहेत. अशात सोनू सूदच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकतंच त्याचं नवं गाणं ‘साथ क्या निभाओगे’चा फर्स्ट लुक समोर आलाय. या गाण्यातील सोनू सूदची पहिली झलक पाहिल्यानंतर आता त्याचे फॅन्स संपुर्ण गाणं पाहण्यासाठी आतुर झालेले आहेत.
सोनूने फराह खान दिग्दर्शित चित्रपट ‘हॅपी न्यू इअर’मध्ये काम केलं आहे. त्यानंतर आता या म्युझिक व्हिडीओत या दोघांनी एकत्र काम केलंय. त्यांच्यासोबत निधि अग्रवाल सुद्धा झळकतेय. म्युझिक फॅक्ट्री निर्मित ‘साथ क्या निभाओगे’ या गाण्याचं शूटिंग पंजाबमध्ये केलंय. या गाण्यात अभिनेता सोनू सूद एक शेतकरी दाखवण्यात आला असून पुढे जाऊन तो पोलिस अधिकारी बनत असतो.
सोनू सूदच्या गाण्याच्या टीझर लवकरच होणार रिलीज
अभिनेता सोनू सूदचं ‘साथ क्या निभाओगे’ हे गाणं ९० च्या दशकातल्या ‘साथ क्या निभाएंगे’ या प्रसिद्ध गाण्याचं रीक्रिएटेड वर्जन आहे. ९० च्या दशकात हे गाणं अल्ताफ राजा आणि टोनी कक्कड यांनी गायलं होतं. अभिनेता सोनू सूद, फराह खान आणि निधि अग्रवाल या तिघांनी या गाण्याचं पहिलं पोस्टर त्यांच्या सोशल मीडियावर अकाउंटवर रिलीज केलंय. त्याचप्रमाणे या गाण्याचा पहिला टीझर येत्या ५ ऑगस्ट रोजी रिलीज करण्यात येईल, याची घोषणा देखील केलीय.
सोनू सूदचं फिल्मी करिअर
करोना काळात गरिबांची मदत करणारा अभिनेता सोनू सूद हा खऱ्या आयुष्यात रिअल लाइफ हिरो तर बनलाच आहे. पण स्क्रीनवर मात्र त्याने खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. 1991 मध्ये रिलीज झालेल्या ‘कालाझागर’ या तमिळ चित्रपटातून त्याने आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली. त्यानंतर अनेक तेलुगु चित्रपटात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवल्यानंतर अखेर २००२ मध्ये बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत ‘शहीद-ए-आजम’ हा त्याचा चित्रपट रिलीज झाला. त्यापाठोपाठ ‘युवा'(2004), ‘आशिक बनाया आपने (2005)’, ‘जोधा अकबर (2008)’ आणि ‘दबंग (2010)’ सारख्या चित्रपटात त्याने काम केलंय.