नुकताच ‘मदर्स डे’ पार पडला. या खास दिवसाचे औचित्य साधून अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या मुलांबरोबरचे, आईबरोबरचे फोटो शेअर करत त्या स्वतःला किती भाग्यवान समजतात हे व्यक्त केले. याच दिवशी एका लोकप्रिय अभिनेत्रीने मुलगी दत्तक घेतल्याची आनंदवार्ता चाहत्यांशी शेअर केली आहे.
कन्नड अभिनेत्री अभिरामी ही दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आतापर्यंत ती विविध चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहून ती तिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी सांगत असते. आता नुकतीच तिने एक खास पोस्ट शेअर करत ती आई झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
अभिरामीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर लेकीबरोबरचे काही फोटो शेअर करत वर्षभरापूर्वी तिने आणि तिच्या पतीने एक मुलगी दत्तक घेतल्याचे सांगितले. तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “आम्ही आता एका मुलीचे पालक आहोत हे सांगताना मला आणि राहुलला खूप आनंद होत आहे. आमच्या मुलीचे नाव कल्की आहे. आम्ही गेल्या वर्षी तिला दत्तक घेतले आणि हा पालकत्वाचा अनुभव आमच्या आयुष्याला कलाटणी देणारा आहे. आम्हाला ही नवी भूमिका उत्तमप्रकारे बजावण्यासाठी तुम्हा सर्वांचे आशीर्वाद हवे आहेत.”
हेही वाचा : “फक्त शाहरुख खानच…,” सुधा मूर्ती यांचं अभिनेत्याबद्दल मोठं वक्तव्य, दिलीप कुमार यांच्या नावाचाही केला उल्लेख
तिची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे. यावर कमेंट्स करताना नेटकरी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या या निर्णयाचे कौतुक करत आहेत.