सलमान खान हा शाहरूख खानकडून नजीकच्या काळात स्टारपदाचा मुकूट हिरावून घेईल, अशी भीती दिग्दर्शक रामगोपाल वर्माने व्यक्त केली आहे. एकेकाळी ज्याप्रमाणे कमल हसन आणि रजनीकांत यांच्यातील स्पर्धेत कमल हसनला स्टारपद गमवावे लागले, तीच परिस्थिती शाहरूखवर ओढावण्याची शक्यता रामगोपाल वर्माने ट्विटरवरील संदेशांच्या मालिकेतून व्यक्त केली.
रामगोपाल वर्माने शाहरूखच्या चित्रपट निवडीवर शंका उपस्थित करताना त्याने कमल हसनच्या चुकांमधून काहीतरी शिकले पाहिजे आणि सलमानसारखे राहिले पाहिजे, असा सल्ला दिला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘फॅन’ या चित्रपटात शाहरूखने ‘गौरव चन्ना’ ही व्यक्तीरेखा साकारताना स्वत:मध्ये मेकअपच्या सहाय्याने काही बदल केले होते. या भूमिकेसाठी व्हीएफएक्स इफेक्टसने शाहरूखची उंची कमी करण्यात आली होती. याशिवाय, आनंद एल. राय यांच्या आगामी चित्रपटातही शाहरूख अशाच धाटणीची व्यक्तिरेखा साकारणार असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर शाहरूखच्या व्यक्तिरेखांचा संदर्भ कमल हसनच्या ‘अप्पू राजा’ चित्रपटातील व्यक्तिरेखांशी जोडून रामगोपाल वर्मा यांनी शाहरूखला धोक्याचा इशारा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्याकाळी कमल हसन हा रजनीकांत यांच्याइतकाच मोठा सुपरस्टार होता. मात्र, यानंतर त्याने ठेंगण्या, जाड्या आणि उंच अशा व्यक्तिरेखा साकारण्याच्या नादात हे स्टारपद गमावले. हेच शाहरूखबाबत घडू शकते आणि त्याचा स्टारपदाचा मुकूट सलमानकडे जाऊ शकतो. शाहरूखचा एक चाहता म्हणून तो चुकीच्या लोकांचे सल्ले ऐकत नसेल, अशी आशा मी करत असल्याचे रामगोपाल वर्माने ट्विटसमध्ये म्हटले आहे. त्यामुळे शाहरूखने कमल हसन यांच्या चुकांपासून धडा घेऊन त्याच्या मेगास्टारपदाच्या मार्गात येणाऱ्या जवळच्या व्यक्तींचे सल्ले टाळावेत. मी याठिकाणी शाहरूखचा मेगास्टार असा उल्लेख करतो कारण, त्याच्याकडे सलमानसारखी शरीरयष्टी नाही किंवा त्याच्याकडे आमिरसारखे कौशल्यही नाही. मात्र, तरीही तो या दोघांपेक्षा उजवा ठरतो.
रजनीकांत नेहमी स्वत:च्या शैलीने काम करतात म्हणून ते रजनीकांत आहेत, तर कमल हसन यांनी नेहमीच दुसऱ्यासारखे होण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी अशी आशा करतो की शाहरूखही सलमानप्रमाणे आपण आहोत तेच दाखवेल, असे रामगोपालने सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Srk might lose his star status to salman khan ram gopal varma