बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांची जोडी खूप हिट झाली आहे. अशीच एक जोडी म्हणजे सुनील शेट्टी आणि अक्षय कुमारची. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. सुनील शेट्टी आणि अक्षय कुमारचे ‘मोहरा’, ‘हेरा फेरी’, ‘फिर हेरा फेरी’ आणि ‘दे दना दन’ हे चित्रपट लोकप्रिय झाले आहेत.

अलीकडेच सुनील शेट्टीने अक्षय कुमारबरोबरच्या त्याच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले. त्याने सांगितले की, अक्षय त्याच्या दिवंगत चुलत भावासारखा दिसत होता, ज्याचे खूप लहान वयात निधन झाले.

रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टीला अक्षय कुमारबरोबरच्या शूटिंगच्या पहिल्या दिवसाबद्दल विचारण्यात आले. तो म्हणाला, “मी ती पहिली भेट कधीच विसरू शकत नाही. माझा एक चुलत भाऊ होता, ज्याचे नाव उल्हास होते. त्याने माझे फोटो पाठवले होते आणि मला माझे पहिले मॉडेलिंग असाइनमेंट मिळाले होते. त्यावेळी मी त्याला एका कार अपघातात गमावले, तो जेमतेम २७-२८ वर्षांचा होता.

अक्षय कुमारबरोबरच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला

अक्षय कुमार आणि त्याच्या चुलत भावातील साम्य आठवताना सुनील म्हणाला, “जेव्हा मी अक्षयला पाहिले तेव्हा क्षणभर मला वाटले की त्याची वागण्या-बोलण्याची पद्धत, क्लीन शेव लुक, गुड लुकिंग बॉय आणि उंची अगदी माझ्या भावासारखी आहे. मी अक्षयला पहिली गोष्ट सांगितली की तू मला माझ्या भावाची आठवण करून देतोस, ज्याला मी एका अपघातात गमावले.”

सुनील शेट्टी अक्षय कुमारबरोबर काम करण्यास का घाबरत होता हे देखील त्याने सांगितले. तो म्हणाला, “मी त्याला असेही सांगितले की, मला दररोज तुझ्याबरोबर काम करावे लागणार हे भितीदायक आहे, कारण जेव्हा जेव्हा मी तुला बघेन तेव्हा मला माझ्या भावाची आठवण येईल आणि तसेच झाले.” या जगात अक्षयपेक्षा मजा-मस्ती करणारा दुसरा कोणी नाही, असंही सुनील शेट्टी म्हणाला.

या चित्रपटात दिसणार सुनील शेट्टी

कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर सुनील शेट्टी ‘केसरी वीर’ या चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये विवेक ओबेरॉय आणि सूरज पांचोली यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट २३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. दुसरीकडे, अक्षय कुमार ‘हाऊसफुल ५’ मध्ये दिसणार आहे. त्याच्याकडे ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘हेरा फेरी ३’ सारखे चित्रपटदेखील आहेत.